Join us  

डॉकयार्ड ते सीएसटीचा ‘उन्नत’ खर्च

By admin | Published: March 05, 2016 3:33 AM

सीएसटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाला थेट मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सॅण्डहर्स्ट रोडपासूनची हार्बर सेवा ही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे

मुंबई : सीएसटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाला थेट मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सॅण्डहर्स्ट रोडपासूनची हार्बर सेवा ही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉकयार्ड ते सीएसटी एलिव्हेटेड रेल्वेमार्ग बांधण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ४00 कोटी रुपये खर्च असल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. पाचव्या-सहाव्या मार्गासाठी असलेल्या निधीतूनच एलिव्हेटेड रेल्वेचा खर्च भागविण्यात येणार आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत सध्या कुर्ला ते कल्याणपर्यंत पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करण्यात आला आहे. फक्त सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम बाकी असून त्याचा सर्व्हेही पूर्ण करण्यात आला आहे. कुर्लापासून सीएसटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करायचा झाल्यास तो सीएसटीपर्यंत थेट आणणे गरजेचे आहे. यात बऱ्याच अडचणी सुरुवातीला आल्याने मार्ग सीएसटीपर्यंत आणायचा तरी कसा, असा प्रश्न रेल्वेला पडला. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कुर्ल्यापासून भायखळ्यापर्यंत हा मार्ग आणण्यासाठी कोणतीही अडचण नाही. मात्र भायखळा ते मस्जिदपर्यंत असलेल्या काही इमारती आणि झोपड्या अडचणीच्या ठरत होत्या. सरकारी आणि खासगी अशा जवळपास ११ इमारतींवर हातोडा पडणार होता. परंतु ते शक्य नसल्याने आणि त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाल्याने सीएसटीतील हार्बरच्या दोन लाइन पी. डीमेलो रोड दिशेने वळत्या करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी डॉकयार्डपासून ते सीएसटीपर्यंत एलिव्हेटेड रेल्वेमार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र एलिव्हेटेड रेल्वेमार्ग बांधण्यासाठी तब्बल ४00 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एलिव्हेटेड रेल्वेमार्ग बांधतानाच सीएसटी पी. डीमेलो रोड दिशेला हार्बरसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म आणि इमारतही बांधली जाणार असून त्याच्या खर्चाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पाचवा-सहावा मार्ग तयार करण्याऐवजी हार्बरच्या एलिव्हेटेड मार्गावर आणि नवीन स्थानकावरच जास्त खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)