कमलेश वानखेडे नागपूर : लोकसभेत भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशापरिस्थितील जुळवाजुळव करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ‘फादर फिगर’ ठरले असते व मोदी-शहा यांचे महत्त्व कमी झाले असते. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट करण्यात आला. केशुभाई पटेल, सुरेश मेहता यांचेही असेच करण्यात आले होते, अशी टीका अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व महाराष्ट्रासाठी नेमलेले निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
मिस्त्री यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बडोदा येथून निवडणूक लढविली होती. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघाचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ घेण्यासाठी मिस्त्री हे रविवारी नागपुरात दाखल झाले. लोकमतशी विशेष बातचीत करताना मिस्त्री म्हणाले, विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या विदर्भात पुन्हा काँग्रेसची वापसी होणार आहे. भाजपला रोखणे, हेच प्रत्येकाचे लक्ष्य आहे. भाजप महाराष्ट्रात पैशाच्या भरवशावर उमेदवार आयात करीत आहे. भाजपचा आयात माल जनता यावेळी परत पाठवेल, अशी टीका त्यांनी केली.गुजरातमध्ये जिंकण्यासाठी भाजप मतांच्या धु्रवीकरणावर भर देते; मात्र यावेळी जनतेचा मूड बदलला आहे. विधानसभेत गुजरातच्या जनतेने मोदी-शहांना घाम फोडला. लोकसभेच्या सर्वेक्षणात २६ पैकी ६ ते ७ जागा काँग्रेसला दाखविण्यात आल्या. मात्र, चित्र यापेक्षा बरेचसे पालटलेले दिसेल. काही निवडक उद्योगपतींना अधिक श्रीमंत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पदवी घेतलेल्या युवकांना मोदी पकोडे विकायला सांगतात, ही एकप्रकारे सुशिक्षितांची थट्टाच असल्याची टीका त्यांनी केली.राहुल ‘वायनाड’मधून लढण्याचा दक्षिण भारताला फायदापंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन जागांवर लढले होते. त्यावेळी त्यांना पराभवाची भीती होती का? राहुल गांधी हे अमेठीतून रेकॉर्ड मतांनी विजयी होतील, यात शंका नाही. मात्र, ‘वायनाड’मधूनही लढणार असल्यामुळे संपूर्ण दक्षिण भारतात याचा काँग्रेसला मोठा फायदा होईल. प्रियंका गांधी यांनी कुठून निवडणूक लढावी, याचा निर्णय पक्ष घेईल. मात्र, त्यांनी लढावे अशी काँग्रेसजनांची इच्छा आहे.गुजरातमध्येही राष्ट्रवादी सोबत येणारच्महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली; मात्र गुजरातमध्ये बिघाडी होताना दिसते, याकडे लक्ष वेधले असता मिस्त्री म्हणाले, गुजरातमध्येही आघाडी व्हावी, यासाठी राहुल गांधी व शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. नक्कीच मार्ग निघेल. राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी गुजरात काँग्रेस सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.