रेसकोर्सवरील क्लबला फायदा?
By admin | Published: July 31, 2014 01:08 AM2014-07-31T01:08:01+5:302014-07-31T01:08:01+5:30
पालिकेबरोबर केलेल्या करारामध्ये पोटमक्त्याची तरतूद असल्यास त्याचा फायदा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबलाही मिळू शकतो
मुंबई : पालिकेबरोबर केलेल्या करारामध्ये पोटमक्त्याची तरतूद असल्यास त्याचा फायदा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबलाही मिळू शकतो, असे संकेत प्रशासनाने सुधार समितीच्या बैठकीत आज दिले़ त्यानंतरही कोणता आक्षेप न घेता सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने पालिकेचा भूखंड मक्त्याने घेणाऱ्या मक्तेदारांना पोटभाडेकरू ठेवण्याची अनुमती देणारे धोरण मंजूर केले़
भूखंड मक्त्याने घेणाऱ्या खासगी संस्था नियमांचे उल्लंघन करून सर्रास पालिकेच्या मालमत्तेवर पोटभाडेकरू ठेवत आहेत़ मात्र यावर अंकुश ठेवणारे कोणतेच धोरण आतापर्यंत नव्हते़ तसेच पालिकेचा महसूलही बुडत होता़ त्यामुळे याबाबतचे धोरण आणून पोटभाडेकरूंना थेट परवानगीच देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे़ मात्र या धोरणाचा थेट फायदा महालक्ष्मी रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबला मिळण्याची शक्यता आहे़
याबाबत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांनी विचारले असता, तशी तरतूद करारामध्ये असल्यास टर्फ क्लब पोटमक्ता देऊ शकेल, असे उपायुक्त मिलिंद सावंत यांनी स्पष्ट केले़
जून २०१३ मध्ये करार संपल्यानंतरही क्लबकडे असलेली रेसकोर्सची जागा शिवसेनेच्या मागणीनुसार पालिकेच्या ताब्यात येण्याची शक्यता धूसर झाली आहे़ त्यामुळे या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नावर पाणी फेरले जाणार आहे़ (प्रतिनिधी)