नोनो रेलचा फायदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:22 AM2019-03-11T01:22:20+5:302019-03-11T01:22:47+5:30
दादर पूर्व स्थानकाजवळ महाविद्यालय आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोनो रेल्वे सोईस्कर असल्याचे दिसून येते.
- सागर नेवरेकर
मुंबई : मोनो रेल्वेचा मध्य मुंबईतील कॉर्पोरेट हबला मोठा फायदा अपेक्षित आहे. आचार्य अत्रेनगर स्थानकाचा वापर परळ, लालबाग आणि काळाचौकी या ठिकाणी जाण्यासाठी केला जात आहे. दादर पूर्व स्थानकाजवळ महाविद्यालय आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोनो रेल्वे सोईस्कर असल्याचे दिसून येते. सद्या मोनो रेल्वे हे एक कुतूहल निर्माण झाले आहे़ कुटुंबासोबत फिरण्यासाठी मोनो रेल्वेचा वापर होत आहे. रविवारी मोठ्या प्रमाणात कुटुंबासमवेत अनेक जण मोनो रेल्वेने फिरण्यासाठी आले होते. याशिवाय बच्चे कंपनीनेसुद्धा मोनो रेल्वेच्या प्रवासात मजामस्ती करत प्रवास अनुभवला. पहिल्यांदा मोनो रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी व्हिडीओ शूटिंग आणि फोटोग्राफी करत प्रवासाचा आनंद घेत होते.
अॅण्टॉप हिलच्या नागरिकांना केईएम रुग्णालयात जायचे असल्यास त्यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत होता. मुंबईतील महत्त्वाची रुग्णालयाचे ही मोनोच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जोडली गेली आहेत. त्यामुळे आता मोनो रेल्वेने प्रवास करणे येथील नागरिकांना सोईस्कर झाले आहे.
पूर्वी प्रतीक्षानगर येथील नागरिकांना केईएम, टाटा रुग्णालय, परळ, लालबाग आणि काळाचौकी इत्यादी ठिकाणी जायचे असल्यास त्यांना रस्ते मार्गाने जावे लागत होते. मोनो रेल्वे सुरू झाल्यापासून नागरिकांचा प्रवास सुलभ झाला आहे. आचार्य अत्रेनगर स्थानकावरून परळ, लालबाग या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येते. आचार्य अत्रे नगर मोनो रेल्वे स्थानक हे चहूबाजूने झोपडपट्टीने वेढलेले आहे. त्यामुळे येथील नागरिक भविष्यात मोनो रेल्वेला किती पसंत करणार हे काही दिवसांनंतर स्पष्ट होईल.
काही प्रवाशांना असे वाटते की, दादर पूर्व स्थानक हे दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात आहे. त्यामुळे प्रवासी दादर पूर्व मोनो रेल्वेच्या नावावरून संभ्रमात आहेत, तसेच वडाळ्यातील नागरिकांना दादर पूर्व मोनो रेल्वेचे नाव बदलण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे. दादर पूर्व येथे आंबेडकर कॉलेज, व्हीजेटीआय कॉलेज, फाइव्ह गार्डन, वडाळा डेपो आणि दादर टीटी ही मुख्य ठिकाणे जवळ आहेत. वडाळ्याचे विठ्ठल मंदिर, राम मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही जवळ आहेत.
मोनोच्या फेºया खूप कमी असून, प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, तसेच तिकीट दर कमी असून, पुढे तिकीट दर वाढविण्याची शंका प्रवाशांकडून वर्तविली जात आहे. मात्र, एका स्टेशनला जाण्यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात आहेत.
- उमेश विचारे, प्रवासी