Join us

वर्क फ्रॉर्म होम संस्कृतीचा फायदा की तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 5:18 PM

आयटी कंपन्या चाचपणी करून घेणार निर्णय  

कर्मचा-यांनाही घरून कामाचा कंटाळा, कार्यालयांची ओढ

मुंबई : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुसंख्य कर्मचा-यांना घरातून काम करणे (वर्क फ्राँम होम) सहज शक्य होत आहे. मात्र, मुंबईत या क्षेत्रात सक्रिय असलेल्या ९४ टक्के कर्मचा-यांना या संस्कृतीचा कंटाळा आला असून त्यामुळे उत्पादकता त्यामुळे घटत असल्याचे मत ९४ टक्के कर्मचा-यांनी व्यक्त केले आहे. तर, घरून काम करण्याची संस्कृती फायदेशीर आहे की कार्यालयातून अधिक प्रभावी काम होते याची चाचपणी केल्यानंतर फायद्या तोट्याचा अंदाज आयटी कंपन्या मांडतील. त्यानंतर कुठल्या कार्यपध्दतीचा स्वीकार करायचा याबाबतच निर्णय होईल असे सांगितले जात आहे.

भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि तंत्रज्ञान सक्षम सेवा (आयटीईएस) यामध्ये ४१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १६०० कर्मचा-यांशी चर्चा करून नाईट फ्रँक इंडिया या सल्लागार संस्थेने कॉर्पोरेट रिअल इस्टेटवरील वर्क फ्रॉम होम कल्चरचा परिणाम हा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यातून ही माहिती हाती ली आहे. दिल्ली (९८ टक्के) , मुंबई (९४ टक्के) बंगळूरू (९० टक्के), पुणे (८८ टक्के) आणि हैदराबाद (८८ टक्के) येथील आयटी कर्मचा-यांना आपल्या कार्यालयांतून काम करण्याची ओढ लागल्याचे हा अहवाल सांगतो. 

आयटी कंपन्यांचा कार्यालयांवरील खर्च अर्थात  रिअल इस्टेट ऑपरेटिंग काँस्ट ही उत्पन्नाच्या ३.६ ते ४.७ टक्के असते. त्यात कार्यालयांचे भाडे ०.५ ते दोन टक्के तर उर्वरित खर्च सुविधा आणि संचलनासाठी होतो. तो खर्च तुलनेने नगण्य आहे. त्यामुळे आयटी कंपन्या वर्क फ्राँम होम आणि कार्यालयातून केल्या जाणारे काम आणि त्यातून मिळणारी उत्पादक क्षमता यांचा आलेख मांडून पुढील निर्णय घेतील अशी माहिती नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले. कर्मचा-यांवर नियंत्रण न ठेवता येणे, व्यवसायाच्या गुणात्मक दर्जा खालावणे, कर्मचा-यांच्या प्रतिभाशक्तीला वाव न मिळणे, डेटा सुरक्षा, स्पर्धात्मक कामाचा आभाव अशा अनेक आघाड्यांवर विचार करूनच आयटी कंपन्या आपली भूमिका येत्या काळात ठरवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

अहवालानुसार नोंदविलेले वर्क फ्राँम होमचे फायदे तोटे 

प्रवास टळल्याने वेळ आणि पैशाची बचत – ६० टक्के

कामावर लक्ष केंद्रिक करणे अवघड – ४२ टक्के

कार्यालयातील सोशल लाईफची उणीव  – ४१ टक्के

इंटरनेटचा आवश्यक स्पीड मिळत नाही. – ६४ टक्के

हॉर्डवेअर संबंधातील अडचणी – ५० टक्के

घरांत मुले आणि अन्य कामांमुळे व्यत्यय – ४२ टक्के 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकमुंबई