साहसी पर्यटन आता लवकरच नियमांच्या चौकटीत; राज्य शासन करणार केंद्राच्या मसुद्यात सूचना

By स्नेहा मोरे | Published: November 23, 2023 07:58 PM2023-11-23T19:58:40+5:302023-11-23T19:58:54+5:30

पर्यटन क्षेत्रातील तरुण पिढीतील पर्यटक साहसी पर्यटनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात

Adventure tourism will soon be regulated; The state government will take notice of the central draft | साहसी पर्यटन आता लवकरच नियमांच्या चौकटीत; राज्य शासन करणार केंद्राच्या मसुद्यात सूचना

साहसी पर्यटन आता लवकरच नियमांच्या चौकटीत; राज्य शासन करणार केंद्राच्या मसुद्यात सूचना

मुंबई - मागील काही वर्षांत साहसी पर्यटनाकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. त्यामुळे साहसी पर्यटनासमोरील आव्हाने, समस्या आणि व्यापकता लक्षात घेऊन आता लवकरच साहसी पर्यटन नियमांच्या चौकटीत अडकणार आहे. केंद्र शासनाकडून साहसी पर्यटनाविषयी विशेष धोरण जाहीर करण्यात येणार असून त्यासाठीचा मसुदा राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. लवकरच राज्य शासनाकडून मसुद्यावर सूचना - हरकती सुचविण्यात येणार आहेत.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या या मसुद्यामध्ये साहसी पर्यटनाविषयीचे नियम, संस्थात्मक आराखडा, दंड, नोंदणी प्रक्रिया आणि विमा संरक्षणाविषयी सर्वसमावेशक तत्त्वांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र शासन व राज्य सरकारच्या वतीने तयार कऱण्यात आलेल्या साहसी पर्यटन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे.

पर्यटन क्षेत्रातील तरुण पिढीतील पर्यटक साहसी पर्यटनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. त्यामुळे या पर्यटकांचा विचार करुन हे धोरण सर्वसमावेशक व्हावे असे केंद्राने सर्व राज्यांना सूचित केले आहे. त्याप्रमाणे, देशातील सर्व राज्य शासनांनी आपापल्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करुन या धोरणासाठी सूचना व हरकती मांडाव्यात असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. साहसी पर्यटनाची व्यापकता वाढविताना पर्यटकांचे संरक्षण केंद्रस्थानी असावे असेही शासनाने मसुद्यात स्पष्ट केले आहे.

राज्यात येथे साहसी पर्यटनाला वाव
राज्यात कोकण किनारा, पश्चिम घाटातील पर्वतराजी, विदर्भ या वैविध्यपूर्ण प्रदेशात पाणी, जमीन व हवेतील साहसी पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. साहसी पर्यटन हे क्षेत्र पर्यटनाचे लोकप्रिय अंग असून पर्यटकांचा साहसी पर्यटनाकडे कल वाढत आहे. पर्यटन धोरणांतर्गत साहसी पर्यटनाला चालना देणे तसेच साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या संस्था, अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स, साहसी क्रीडा संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, संघटना, क्लब यांची नोंदणी, विनियमन, सनियंत्रण, नियोजन, प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश करुन साहसी पर्यटन धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विभागाती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
चौकट
साहसी पर्यटन हा एक पर्यटनाचा प्रकार सध्या मुख्यत्वे तरुण वर्गामध्ये फार प्रचलीत आहे. साहसी पर्यटन म्हणजे दुर्गम भागात जाऊन प्रवास करणे व तिथे पर्यटकाने अनपेक्षित गोष्टीची अपेक्षा ठेवणे होय.  पर्यटकांना कम्फर्टझोनमधून बाहेर येण्याच्या उद्देशाने हे पर्यटन वाढत आहे. राज्यासह देशभरात पर्यटकाचा साहसी पर्यटनाकडे ओढा वाढताना दिसून येत आहे. साहसी पर्यटन मुख्यत्वे गिर्यारोहण, रॅप्लिंग, रॉक क्लायंबिंग, स्किइंग, ट्रेकिंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जंपींग, स्कुबा डायव्हिंग इत्यादी प्रकारांत विभागले गेले आहे.

Web Title: Adventure tourism will soon be regulated; The state government will take notice of the central draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.