प्रारूप किनारा आराखड्यामुळे कोळीवाड्यांवर विपरित परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:54 PM2020-03-05T23:54:41+5:302020-03-05T23:54:47+5:30
वांद्रे पूर्व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवारी दुपारी उपनगरी जिल्ह्यातील किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजनेच्या अंतिम मंजुरीसंदर्भात हरकती-सूचनांवर सुनावणी झाली.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : प्रारूप किनारा व्यवस्थापन आराखड्यामुळे गावठाण व कोळीवाड्यांवर विपरित परिणाम होणार असल्याची ठाम भूमिका वॉचडॉग फाउंडेशन आणि बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनने घेतली. वांद्रे पूर्व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवारी दुपारी उपनगरी जिल्ह्यातील किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजनेच्या अंतिम मंजुरीसंदर्भात हरकती-सूचनांवर सुनावणी झाली.
गोराई येथील फादर एडवर्ड जासिंटो, सरपंच रॉसी डिसूझा, उपसरपंच रॉयस्टन गुडिन्हो यांच्यासह स्थानिक या सुनावणीला उपस्थित होते. वर्सोवा आणि मार्वेमधील क्षेत्र सीआरझेड प्रकारात चिन्हांकित केले जात आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बिल्डर्स लॉबीच्या शोषणापासून गावठाण व कोळीवाड्यांच्या संरक्षणाची गरज अधोरेखित झाली पाहिजे, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली.
मढ, मार्वे, मनोरी, कुलवेम आणि गोराई या गावठाणांना गावठाण विस्तार धोरणांतर्गत लाभ देण्यावर प्रकाश टाकण्यात आला. सीआरझेड तिसरा प्रवर्गातील पायाभूत सुविधांसाठी पुरेशी तरतूद करण्यात यावी. एस्सेल वर्ल्डच्या कडेवर खारफुटीचा मोठा भाग असूनही
तेथे हॅझार्डलाइनचे चिन्हांकन कमी आहे, तर मनोरी खाडीच्या
समोरील किनाऱ्यावर जेथे दाट लोकसंख्या आहे, तेथे हॅझार्डलाइन
२ ते ३ कि.मी.पर्यंत चिन्हांकित आहे, अशी माहिती गोराईतील रहिवाशांनी जनसुनावणीदरम्यान दिली.