घोडबंदर : ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नाला लागलेली गळती दूर होत नसली तरी बसेसवर जाहिरात प्रदर्शित करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न परिवहन प्रशासनाकडून सुरु आहेत. १०८ जुन्या, भाडेतत्वावरील २५, जेएनएनआरयूएमअंतर्गत सेवेत असलेल्या १६० बस अशा एकूण २९३ बस नव्याने दाखल होत असलेल्या जेएनएनआरयूएम अंतर्गत २३० बस मिळून ५२३ बसवर जाहिरातीचे हक्क देऊन त्यापोटी सुमारे ११ कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.२९३ बसवर जाहिरात प्रदर्शित करण्याबाबत आधीच निविदा सूचना देण्यात आल्या आहेत. पैकी २९ बस निविदाकाराने मागणी केल्यानुसार जाहिरातीसाठी रंगविण्यास देण्यासाठीचा प्रस्ताव अटीशर्तीसह पुन्हा सादर केला आहे. या सादर झालेल्या प्रस्तावानुसार ५ कोटी ८० लाख १४ हजार इतके जाहिरात मूल्य गृहीत धरले आहे. या प्रस्तावाला महासभेची मान्यता आवश्यक असल्याचा शेरा मुख्य लेखा व वित्तअधिकारी सुधीर नाकाडी यांनी मारला आहे. तसेच, जेएनएनआरयुएम अंतर्गत परिवहन सेवेच्या ताफ्यात २३० नवीन बस दाखल होणार आहेत. त्यावरील प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातीमधून अंदाजे साडेपाच कोटी रु पयांचे उत्पन्न अपेक्षति आहे. दोन्ही प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्यानंतर बसेसवर विविध जाहिराती झळकणार आहेत यामुळे परिवहन सेवेची आर्थिक तंगी थोड्या प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होणार आहे.याचप्रमाणे, जाहिरात उत्पन्नासाठी परिवहन सेवेने बसथांब्याचा पर्याय निवडला होता.परंतु हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे उत्पन्नावर मर्यादा आल्या होत्या. मुळात ठेकेदारांनी बांधलेले बसथांबे हे वादात सापडल्यामुळे ठाणे शहरात असलेली बस थांब्यांची संख्या निश्चित झालेली नाही. त्यामुळे, मिळणारे उत्पन्न संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. आता बसेसवरील जाहिरातीमधून मिळणारे उत्पन्न परिवहनच्या तिजोरीत किती जमा होते. यावरच परीवहनचा गाडा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)
जाहिरातींतून परिवहनला ११ कोटी?
By admin | Published: January 13, 2015 12:45 AM