जाहिराती निघाल्या, ८ महिन्यांत ‘एमपीएससी’ची २१ हजार पदे भरणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 07:56 AM2023-11-10T07:56:09+5:302023-11-10T07:58:39+5:30
‘राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून जागा भरण्यासाठी जशी मागणीपत्रे येतात. त्यानुसार आयोग भरती प्रक्रिया राबवते.
- रेश्मा शिवडेकर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग दिल्याने तब्बल २१ हजार पदांच्या मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांश पदांच्या जाहिराती निघाल्या असून, पुढील आठ महिन्यांत भरतीची ही प्रकिया पूर्ण होईल.
‘राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून जागा भरण्यासाठी जशी मागणीपत्रे येतात. त्यानुसार आयोग भरती प्रक्रिया राबवते. गेल्या वर्षभरात राजपत्रित ‘अ’, ‘ब’ आणि अराजपत्रित ‘ब’ गटासह लिपिक पदांकरिता तब्बल २१ हजार पदे भरण्याची मागणी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून करण्यात आली.
या पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे. येत्या आठ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल,’ अशी माहिती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ‘लोकमत’ला दिली. यात सर्वाधिक ८ हजार पदे लिपिकांची आहेत. तर अ गटापैकी सर्वाधिक दोन हजार पदे वैद्यकीय शिक्षण विभागातील आहेत. डिसेंबरपर्यंत यात आणखी भर पडेल. आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच भरती प्रक्रिया राबविली नव्हती. पदभरती रखडल्याने ऐन उमेदीची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात घालवणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष होता. (क्रमश:)
लिपिक पदे प्रथमच
केवळ मुंबईतील लिपिक पदे आयोगाकडून भरली जात. परंतु, आता मुंबईबाहेरील लिपिक पदेही आयोगाकडून भरण्यात यावी, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आल्याने यंदा इतक्या मोठ्या संख्येने लिपिक पदे भरली जात आहेत.
- डॉ. दिलीप पांढरपट्टे,
आयोगाचे प्रभारी अध्यक्ष
राज्य सरकार करत असलेल्या भरतीचे स्वागत आहे. परंतु, सरकारच्या विविध विभागांमध्ये लाखोंनी पदे रिक्त आहेत. तो बॅकलॉग भरून काढण्यास ही पदभरती पुरेशी नाही.
- ग. दि. कुलथे, माजी अध्यक्ष आणि सल्लागार, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ.