महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवायच्या जाहिरातींना चाप बसणार

By सचिन लुंगसे | Published: February 15, 2024 10:26 AM2024-02-15T10:26:10+5:302024-02-15T10:26:59+5:30

जाहिरातींच्या शोधासाठी घेणार कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाची मदत

Advertisements without Maharera registration number and QR code will be fine | महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवायच्या जाहिरातींना चाप बसणार

महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवायच्या जाहिरातींना चाप बसणार

मुंबई : महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय छापल्या जाणाऱ्या जाहिरातींवर महारेराने गेल्या वर्षापासून स्वाधिकारे (Suo Motu) कारवाई सुरू केलेली आहे . त्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकल्पांवर दंडात्मक कारवाईही केलेली आहे. करीत आहे. दिवसेंदिवस पारंपरिक माध्यमांशिवाय जाहिरातींची नवनवीन माध्यमे विकसित होत आहेत. या कारवाईत अधिक व्यापकता यावी. कुठल्याही माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या अशा जाहिरातींना अटकाव बसावा. यासाठी महारेराने या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याचे ठरवले.

त्यानुसार सर्व माध्यमांतील जाहिरातींच्या अनुषंगाने ग्राहकहिताची काळजी घेणाऱ्या, या क्षेत्रातील अ‍ॅडव्हर्टायझींग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया (Advertising Standard Council of India- ASCI ) या स्वयंविनियामक संस्थेशीच महारेराने नुकताच सामंजस्य करार केला आहे. ही या क्षेत्रातील जाहिरातदारांचीच स्वयंविनियामक संस्था असून वर्तमानपत्रे, वाहिन्या , फेसबुक, इंस्टाग्राम , एक्स (ट्विटर),  संकेतस्थळ अशा विविध ऑनलाइन माध्यमातूनही प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे संनियंत्रण त्यांच्यामार्फत नियमितपणे केल्या जाते. शिवाय महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय छापल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या शोधासाठी ते कृत्रिम बुध्दिमत्ता ( Artificial Intelligence) या तंत्रज्ञानाचीही मदत घेणार आहेत.

या करारानुसार सर्व माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या अशा प्रकारच्या जाहिराती नियमितपणे ते महारेराच्या निदर्शनास आणून देतील. त्यासाठी अशा प्रकारच्या जाहिरातींचा शोध , त्याचे संनियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र गटाची निर्मिती करतील. या करारावर  महारेराचे प्रशासकीय अधिकारी  वसंत वाणी आणि अ‍ॅडव्हर्टायझींग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कपूर यांनी सह्या केल्या आहे.

स्थावर संपदा कायद्यानुसार 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त किंवा 8 सदनिकांचा कुठलाही  प्रकल्प( यात प्लाॅटसचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेराकडे  नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि महारेरा  नोंदणीक्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात,  त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी ,  विक्री  करता येत नाही.त्यासोबतच 1 ऑगस्ट पासून क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे महारेराने बंधनकारक  केलेले आहे.

क्यूआर कोडमुळे प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध  होते. कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पांत गुंतवणूक करण्यापूर्वी ,आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी , यासाठी महारेरा नोंदणीक्रमांक आणि सोबतच क्यूआर कोडही पाहणे गरजेचे आहे. म्हणून महारेराने याबाबत स्वाधिकारे कारवाई सुरू केलेली असून महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोड छापणे, दर्शवण्याबाबतची प्रकल्पांची उदासीनता खपवून घ्यायची नाही, ही महारेराची भूमिका आहे.

गृहनिर्माण प्रकल्पाला महारेरा नोंदणीक्रमांक आहे म्हणजे गुंतवणूक सुरक्षित आहे, असा विश्वास निर्माण करण्यात महारेरा यशस्वी झालेले आहे. या विश्वासाला कुठेही छेद जाऊ नये यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. नोंदणीक्रमांक असल्याशिवाय विकासकाला कुठल्याही प्रकारची जाहिरात करता येत नाही. तरीही अशा जाहिराती केल्या जातात हे निदर्शनास आल्यानंतर महारेराने अशा प्रकल्पांवर स्वाधिकारे दंडात्मक कारवाई  सुरू केलेली आहे. सोबतच घरखरेदीदारांना प्रकल्पाची समग्र महत्वाची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी 1 ऑगस्टपासून  क्यूआर कोडही अशा जाहिरातींसोबत छापणेही बंधनकारक केलेले आहे. - अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Web Title: Advertisements without Maharera registration number and QR code will be fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई