मुंबई : मुंबईतील उपकरप्राप्त इमारतीतील (सेस) इमारतींच्या मास्टर लिस्टची नोंद ठेवण्यासाठी म्हाडाने आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्टर लिस्टसाठी म्हाडाने एक सॉफ्टवेअर तयार केले असून १० जूनला याबाबत जाहिरात काढण्यात येणार आहे. नागरिकांना यामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार असल्याचे म्हाडाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आले.
या सॉफ्टवेअरबाबत म्हाडाच्या मुख्यालयामध्ये काही दिवसांपूर्वीच सादरीकरण पार पडले होते. या सॉफवेअरमधील नोंदीमुळे मास्टर लिस्टमध्ये पारदर्शकता येणार असून संपुर्ण माहिती जमा होणार असल्याचे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे म्हणणे आहे. तसेच या ऑनलाइनच्या सहाय्याने मूळ रहिवाशांची नोंद झाल्याने घुसखोरांचा प्रश्न आपसूकच निकालात निघणार आहे.
म्हाडाने अकरा वर्षांपुर्वी संक्रमण शिबिरातील रहिवाशांची यादी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्ययावत पद्धतीने कोणतीही यादी तयार झालेली नसल्याने बायोमेट्रिक पाठोपाठ ऑनलाईन नोंदणीस अनन्य साधारण महत्त्व लाभणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते-कार्यकर्ते, दलालांच्या संगनमताने मास्टर लिस्टमधील यादीत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. या सर्व आरोपप्रत्यारोपावर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाइनची मदत मिळेल, असे सुत्रांनी सांगितले.
मास्टर लिस्ट म्हणजे काय?मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास झाल्यावर त्यातील काही अतिरिक्त घरे म्हाडाला मिळतात. ही घरे संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाशांना दिली जातात. या रहिवाशांच्या नावाची मास्टर लिस्ट असते. मास्टर लिस्टमधील घरे मूळ रहिवाशांशिवाय अन्य कोणालाही देता येत नाहीत.