उत्पादनाचा खप वाढविणारी सेलिब्रिटींची जाहिरातबाजी रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:36 AM2020-08-20T04:36:01+5:302020-08-20T04:36:08+5:30
उत्पादक, जाहिरात कंपन्या कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. दोषी आढळल्यास अन्य जाहिरात करण्यास सबंधितांबर कायद्याने बंदी घातली जाऊ शकते.
संदीप शिंदे
मुंबई : उत्पादनांना खप वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींना सोबत घेत जाहिरातींचा मारा केला जातो. अनेकदा ती उत्पादने अपेक्षाभंग करणारी ठरतात. तर, काही वेळा ग्राहकांची फसवणूकही होते. त्या विरोधात दाद मागण्यासाठी सध्या कोणतीही ठोस व्यवस्था नाही. मात्र, नव्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अशा प्रकारची फसवणूक करणारे उत्पादनांचे उत्पादन, जाहिरात कंपनी, त्यात सहभागी झालेले कलाकार यांना १० ते ५० लाखांचा दंड आणि फसवणूक गुन्हेगारी स्वरुपाची असेल तर २ ते ५ वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.
उत्पादनांची योग्य माहिती आणि त्यांच्या फायद्या तोट्याबाबतची खातरजमा न करता जाहिराती करणारे अभिनेते, मॉडेल, क्रीडा-कला क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वच प्रकारच्या सेलिब्रिटी तसेच, उत्पादक, जाहिरात कंपन्या कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. दोषी आढळल्यास अन्य जाहिरात करण्यास सबंधितांबर कायद्याने बंदी घातली जाऊ शकते.
वादग्रस्त जाहिरातींच्या विरोधात तक्रार करण्यासाठी सध्या दिल्लीतील आस्कीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागते. नव्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवरच तक्रार नोंदवण्याची व्यवस्था केली जाईल. हा कायदा उपयुक्त असून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, त्याची कठोर अंमलबजावणी करेल अशी आशा मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे, विधि विभाग प्रमुख अर्चना सबनीस यांनी व्यक्त केली आहे.
>सेलिब्रिटींसाठी मार्गदर्शक तत्त्वे
जाहिरात करणाऱ्या कलाकारांनी उत्पादनांबाबत पुरेशी काळजी घेत काम केले असेल तर त्यांना कारवाईतून सूट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ती आमच्यासाठी मॉडलिंग असाईनमेंट होती असा पवित्रा घेत कलाकार हात वर करू शकतात. ते टाळण्यासाठी या कलाकारांनी जाहिराती करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी आणि काय टाळावे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एओपी (स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर्स) तयार केली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी दिली.
पारदर्शक कारभाराचा पुरस्कार
वादग्रस्त जाहिरातींच्या विरोधात कारवाईचे अधिकार प्राप्त झाले म्हणजे जाहिरात करणाºया कलाकारांना नाहक त्रास देण्याचे प्रयत्न टाळले जातील. जे चूक आहे त्या विरोधात निश्चित कारवाई केली जाईल. आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून फसवणूक होणार नाही याची जबाबदारी जाहिरातींशी संलग्न असलेल्या प्रत्येकानेच घ्यावी यासाठी त्यांना उद्युक्त करण्याचाही प्रयत्न असेल.
- निधी खेर, मुख्य आयुक्त, सीसीपीए