मुंबई : वडाळा-चेंबूर-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल सातत्याने तोटयात आहे. याचा परिणाम मोनोच्या महसूलावर होत आहे. परिणामी हा महसूल वाढविण्यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जाहिरातबाजी करणार असून, त्यानुसार, मोनोरेलच्या खाबांना जाहिरातबाजीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन मोनोरेलचा पुनर्बांधणी केली आहे. भारतीय सुटया भागाच्या मदतीने ही पुनर्बांधनी करण्यात आली असून, स्वदेशी मोनोवर भर दिला जात आहे. आता मोनोरेलच्या मार्गावर मोनो धावत असली तरी तिला प्रतिसाद कमी आहे. कारण वडाळा, चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक हा मार्गावर प्रवास करणारे प्रवासी फार कमी आहेत.मुळात वडाळयासारख्या परिसरात रहिवासी वस्ती जास्त असून, कार्यालये अथवा तत्सम वस्ती कमी आहे. परिणामी येथे रहदारीदेखील कमी आहे. अशावेळी थेट चेंबूरहून, वडाळ्याहून मध्य मुंबई म्हणजे लालबाग गाठणा-या प्रवाशाची संख्या कमी आहे. ऐन पीक अवर म्हणजे सकाळी आणि सायंकाळी देखील मोनोरेलचे प्रवासी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असतात. परिणामी मोनोरेल तोटयात असली तरी तिचे प्रवासी वाढावे म्हणून प्राधिकरण प्रयत्न करत आहेत.प्राधिकरणाकडील माहितीनुसार, प्रवासी वाढविण्यासाठी दोन मोनोरेलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर कसे येईल? यावर भर दिला जात आहे. शिवाय मोनोरेलला महसूल मिळावा म्हणून मोनोच्या खांबावर जाहिरातीसाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, आता प्राधिकरणाने मोनोरेलच्या खांबावर जाहिरातीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणणे असले तरी त्यांना प्रतिसाद किती मिळतो हे काळच ठरविणार आहे.कारण मोनो जेथून जेथून धावते तो परिसर फारसा रहदारीचा नाही. अशावेळी संबंधित ठिकाणी जाहिरातदारांकडून किती प्रतिसाद मिळले? यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र महालक्ष्मी ते दादरपर्यंतच्या मोनोरेलच्या प्रवासात मोठी वस्ती आहे. येथे मोनोरेलच्या खांबावर जाहिरात लागल्या तर निश्चितच काही तरी फरक पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.