मुंबई- काल महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा झाली. या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनी या सभेवर टीका केली. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. 'जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
'लोकांसमोर कसे जायचे. जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे - सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे, अशी थेट टीका विरोधी पक्षनेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर केली. (Maharashtra Politics )
'सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनेबद्दल जाहिरात करून लोकांना जागृत केले असते तर समजू शकतो. आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी अशी जाहिरातबाजी केली नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळीही जाहिराती केल्या नाहीत असंही अजित पवार म्हणाले.
फडणवीस महिलांवर फिदा; अर्थसंकल्पाचं कौतुक करताना माजी मंत्र्यांचे अजब विधान
'आज केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्या अनिल बोंडेना सांगा तपास करा.'दूध का दूध पानी का पानी' येऊ द्या लोकांसमोर... वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे... यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. अजिबात कुणाचा मुलाहिजा बाळगू नका पण त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळायला हवे
शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाले ती मदत मिळाली नाही. पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्या तमाम शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणात काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महागाई आटोक्यात आणता येत नाही
आता सध्या जे सुरू त्याचे एकमेव कारण म्हणजे महागाई आटोक्यात आणता येत नाही, बेरोजगारी कमी करता येत नाही. उद्योगधंदे आणण्यासाठी जे पोषक वातावरण तयार व्हायला हवे ते होत नाही. कायदा व सुव्यवस्था आटोक्यात आणली जात नाही महिलांवर, मुलींवर भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. अरे हे काय चाललंय ही मोगलाई आहे का? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रिक्षावाला हा माझाच शब्द आहे पवारसाहेबांचा नाही. मी पवारसाहेब यांचे नाव घेतले पण शब्द माझा उध्दवजी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होते असे म्हटले होते, त्यामुळे हा वाद अरविंद सावंत यांनी क्लीअर केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.