मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची तुलना बिहारची राजधानी पाटणाशी करून दोन्ही शहरांचा अपमान केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही तुलना अयोग्य असून, या वक्तव्याच्या रूपाने बिहारी आणि उत्तर प्रदेशमधील लोकांबद्दल त्यांच्या मनात असलेला द्वेषच बाहेर आला आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. बुधवारी, भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. शिवसेनेने वीस वर्षांत मुंबईचे रूपांतर पाटण्यात केले असल्याची टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईची पाटण्याशी केलेली तुलना अयोग्य आहे. त्यांनी ताबडतोब आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या मनात बिहारी आणि उत्तर प्रदेशबाबत राग असल्याचा दावाही त्यांनी केला. एकीकडे मतांसाठी भाजपा नेते उत्तर भारतीयांचे मेळावे भरवत आहेत, कार्यक्रम घेत आहेत, तर दुसरीकडे अशा वक्तव्यातून हिणविण्याचे कामही सुरू आहे. अजूनही भाजपाचे लोक बिहार आणि पाटण्याचा अपमान करतात. उत्तर भारतीयांकडे केवळ व्होटबँक म्हणून पाहणे बंद करा, अशी टीकाही निरुपम यांनी भाजपा नेत्यांवर केली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार असून, त्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपाने छुपी युती केलेली आहे. राज्य सरकार नोटीस पीरियडवर आहे, आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, अशी धमकी शिवसेना नेते देत आहेत. राजीनाम्याची भाषा जनतेची दिशाभूल असून, राजीनामा देण्याइतपत हिंमत सेनेत नसल्याचे निरुपम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या मनात उत्तर भारतीयांबद्दल अढी : निरुपम
By admin | Published: February 10, 2017 4:59 AM