सेना मंत्र्यांना उद्धव यांचा कानमंत्र
By admin | Published: January 14, 2017 04:37 AM2017-01-14T04:37:41+5:302017-01-14T04:47:56+5:30
नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री प्रचारालाच गेले नाहीत, याबद्दल प्रसार माध्यमांमध्ये चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर
मुंबई : नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री प्रचारालाच गेले नाहीत, याबद्दल प्रसार माध्यमांमध्ये चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘नगरपालिकेत झाले ते झाले, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही गावागावात दिसायला हवे,’ असा आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला.
या मंत्र्यांची बैठक ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर घेतली.
मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचाच आहे, पण जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील यशदेखील महत्त्वाचे असेल. मुंबईतील निवडणुकीच्या नावाखाली आम्हाला नगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही दुर्लक्षिले जात आहे, ही भावना ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये जाता कामा नये, असे उद्धव यांनी बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाशी बहुतेक ठिकाणी युती होऊ शकलेली नव्हती. तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेऊन पक्षाला अनपेक्षित यश मिळवून दिले होते. पक्ष आणि सरकारमधील मंत्री यांच्यात समन्वयाची कोणतीही व्यवस्था शिवसेनेने तयार केलेली नाही.
मुख्यमंत्री आणि भाजपाचे अन्य मंत्री आणि पक्षसंघटनेत समन्वयासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी वर्षभरापूर्वी नियुक्त करण्यात आले. या समन्वयाचा चांगला फायदा पक्षजनांना झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र पक्षाच्या मंत्र्यांबाबत असा अनुभव येत नाही.
सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी या वेळी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वत:ला झोकून देणे अपेक्षित आहे. कोणत्या मंत्र्यांनी किती दौरे केले, सभा घेतल्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या याचा लेखाजोखा आपण निवडणुकीनंतर घेऊ, असे उद्धव यांनी सांगितल्याची माहिती आहे. (विशेष प्रतिनिधी)