चोरी न करण्याचा सल्ला तरुणाला भोवला, मित्राच्या पोटात चाकू खुपसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:19 PM2023-05-16T15:19:09+5:302023-05-16T15:19:22+5:30
पोलिसांनी इस्माइल इब्राहिम शेख उर्फ चना याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : वांद्रे पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात मित्राला चोरी करू नको असा सल्ला देणे एका तरुणाला भारी पडले. या मित्रांनी या तरुणाच्या पोटात चाकू खूपसून त्याला गंभीर जखमी केले. तसेच उपचारासाठी नेत असतानाही जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी इस्माइल इब्राहिम शेख उर्फ चना याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार झिशान खान (२८) हे रिक्षाचालक असून त्यांची आरिफ पठाण या तरुणाची चांगली मैत्री आहे. तर शेख हा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती असून, त्याची या ठिकाणी दहशत आहे. सतत हत्यार घेऊन फिरत असल्याने कोणीही त्याच्या वाट्याला जात नाही. खान हे पठाण सोबत १३ मे रोजी १० वाजण्याच्या सुमारास वांद्रेच्या जॉगर्स पार्कमध्ये गप्पा मारत बसले होते. तेव्हा शेख आणि त्याचा मित्र इजाज यांच्या घरी चोरी करताना पकडले गेले असे पठाणने खानना सांगितले. त्यानंतर शेखलाही पठाणने तू आपल्या भागात चोरी करतोस आणि तुझ्यामुळे आमचे नाव बदनाम होते असे सांगत चोरी न करण्याची समज दिली होती.
संध्याकाळी पठाण हा खान सोबत असताना शेख त्यांच्याजवळ आला आणि मी कोणत्या परिसरात चोरी करायची हे तु मला शिकविणार का असे म्हणत शिवीगाळ करू लागला. तुला माहीत आहे ना मी या भागाचा दादा आहे असे ही बोलल्याने पठाणने शेखकडे माफी मागितली आणि तिथून जाऊ लागला.
शेखने सोबत आणलेला चाकू पठाणच्या पोटात घुसवला ज्यात तो गंभीर जखमी झाला.
खान यांनी अन्य मित्रांच्या मदतीने पठाणला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करताना फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनाही शेखना धमकाविले.
तो तिथून निघून गेल्यानंतर पठाणला भाभा रुग्णाला उपचारासाठी नेण्यात आले व पुढे केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार शेखच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.