लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी सचिव, तथा वरळी साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ सल्लागार, अपंग मैत्री संस्थेचे अध्यक्ष केसरीनाथ शिवराम पाटील यांचे रविवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
दि. १५ जुलै १९३३ रोजी वरळी कोळीवाडा येथे केसरीनाथ पाटील यांचा जन्म झाला. कोळी बांधवांच्या सहवासात राहिल्यामुळे कष्टकऱ्यांच्या जीवनसंघर्षाशी त्यांचा जवळून परिचय आला. १९६२ मध्ये ते हाजीअली येथील अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्थेत अपंग कार्यशाळेचे पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना अपंगांचे जीवन जवळून पाहता आले. १९५७ मध्ये वरळी गावात राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी विभाग संघटक म्हणून काम पाहिले. तसेच १९६४ साली वरळीत बालकराम वरळीकर यांनी सुरू केलेल्या साने गुरुजी कथामालेत सहभाग घेतला.
अपंगांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या ‘जिद्द’ या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. १९८२ मध्ये राज्य शासनातर्फे या पुस्तकाचा गौरव करण्यात आला. गेली ६० वर्षे ते अपंगांच्या उद्धारासाठी कार्य करीत होते. वरळी गावात त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने लोकोपयोगी उपक्रम राबविले.
अनेक वर्षे त्यांनी वरळी साने गुरुजी कथामालेचे अध्यक्षस्थान भूषविले. सध्या ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय वरळी कोळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य साने गुरुजी कथामाला, विद्यार्थी व अपंगांच्या सेवेसाठी अर्पण केले.