Join us

अ‍ॅड. उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात?; चांगल्या 'निकाला'साठी राष्ट्रवादीचा 'युक्ति'(वाद)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 11:17 AM

महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे 'पॉवरफुल्ल' प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं.

मुंबईः येत्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरून भाजपाला धोबीपछाड देण्याचा इरादा काँग्रेस-राष्ट्रवादीनं पक्का केला आहे. त्यादृष्टीनेच, आघाडीची घडी बसवण्याचे, जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न थेट पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर सुरू आहेत. राष्ट्रवादीने तर आपले चार उमेदवार निश्चितही केलेत. अशातच, महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे 'पॉवरफुल्ल' प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं. जळगाव मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची सकारात्मक चर्चा सुरू आहे. ज्या ४० जागांविषयी वाद नाही, त्या फिफ्टी-फिफ्टी वाटून उर्वरित ८ जागांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच, कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांची, तर रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी राष्ट्रवादीने जवळपास निश्चित केलीय. पक्षाच्या नेत्यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. रायगड, जळगाव, बीड, परभणी, उस्मानाबाद, कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघांबाबत या बैठकीत चर्चा झाली. तेव्हाच, उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आल्याचं समजतं. अर्थात, निकम यांच्याशी चर्चा करून, त्यांची सहमती घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची कारकीर्द चांगलीच यशस्वी आहे. मुंबईतील १९९३चं बॉम्बस्फोट प्रकरण, २६/११ दहशतवादी हल्ला, कोपर्डी बलात्कार प्रकरण, शक्ती मिल बलात्कार प्रकरण यासारख्या हाय-प्रोफाइल खटल्यांच्या निकालात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्वाभाविकच, महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वर्तुळात त्यांच्याभोवती वेगळं वलय, वजन आहे. त्याचाच फायदा करून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होताना दिसतोय. अर्थात, ते कसा 'युक्तिवाद' करतात आणि अ‍ॅड. निकम या प्रकरणाचा 'निकाल' काय देतात, हे पाहावं लागेल.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसउज्ज्वल निकम