सीआयएसएफच्या दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:41 AM2018-04-20T02:41:10+5:302018-04-20T02:41:10+5:30
दोन तरुणींसह २० ते २५ तरुण फटाके वाजवत होते. त्यांनी फटाके वाजवू नका, अशी जमावाला विनंती केली.
मुंबई : फटाके वाजवू नका याची विनंती करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) साहाय्यक उपनिरीक्षकासह त्याच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला चढविल्याचा प्रकार अॅण्टॉप हिल येथे घडला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी गर्भवती आहे. दोघेही या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अॅण्टॉप हिल येथील सी.जी.एस. कॉलनीमध्ये देवेंद्र जोगिंदर (२९) हे पत्नी सोनू कुमारीसोबत राहतात. सीआयएसएफमध्ये साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांची पत्नीही सीआयएसएफमध्ये कार्यरत असून सहा महिन्यांची गर्भवती आहे. दोघेही सहारा इंटरनॅशनल एअरपोर्टवर कार्यरत आहेत.
१३ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे सेवा बजावून दोघेही रात्री दहाच्या सुमारास घरी आले. पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या इमारतीखाली फटाके वाजविण्यास सुरुवात झाली. त्या आवाजामुळे पत्नीला त्रास होत असल्याने ते खाली उतरले. तेथे दोन तरुणींसह २० ते २५ तरुण फटाके वाजवत होते. त्यांनी फटाके वाजवू नका, अशी जमावाला विनंती केली. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. ते घरी गेले. मात्र, पत्नीला जास्त त्रास होत असल्याने त्यांनी पुन्हा त्यांच्याकडे विनंती केली. मात्र फटाके वाजवणारा जमाव काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. रागाने त्यांनी देवेंद्र यांना मारहाण सुरू केली. तेथे असलेल्या देवेंद्र यांच्या मित्राने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांनाही मारहाण केली.
देवेंद्र यांनी घाबरून घराकडे धाव घेतली. तेव्हा मुलेही त्यांच्या मागे घरापर्यंत गेली. पत्नीने दरवाजा उघडला. देवेंद्र घरात पळाले. पत्नी दरवाजा लावत असताना, त्यांनाही मारहाण करत जमाव घरात शिरला. त्यापैकी एकाने तलवारीने देवेंद्र यांच्या डोक्यात वार केला आणि त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. त्या खाली कोसळल्या असता त्यांच्या पोटावरही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या जमावाच्या खाली उभ्या असलेल्या काही साथीदारांनी देवेंद्र यांच्या खिडक्यांवर दगड मारले.
दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने या परिसरात फटाके फोडत असताना, देवेंद्र यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या प्रकरणी देवेंद्र यांच्याविरुद्धही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अॅण्टॉप हिल पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.