- मनीषा म्हात्रेमुंबई : एरॉनॉटीकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी मालाडच्या तरुणाने पोलंडचे वॉरसॉ तंत्रज्ञान विद्यापीठ गाठले. तेथील शिक्षण पूर्ण केल्यानंतर सहा वर्षांनी घरी परतत असतानाच तो नॉट रिचेबल झाला. तब्बल गेल्या सहा महिन्यांपासून मुलगा संपर्कात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी मुलाच्या शोधासाठी पोलंड प्रशासन, इंटरपोल, तसेच दूतावासाकडे तक्रार दिली आहे.मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले चौहान कुटुंबीय मालाडच्या मढ जेट्टी रोड परिसरात राहतात. अभियंता राकेशचीआई गृहिणी तर वडील सुतारकाम करतात. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे काका भीम चौहान यांनीच त्यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. यातील राकेशने मुंबईत एरॉनॉटीकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण पोलंडच्या वॉरसॉ युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नोलॉजीमधून घेण्याचे सांगितले. त्यानुसार, कुटुंबीयांनी २०१३ साली त्याला पोलंडला पाठविले. तेथेच शिक्षणाबरोबर त्याने रॉकेट इंजिनीअरिंगमध्ये इंटर्नशिप सुरू केली. शिक्षणादरम्यान २०१६मध्ये त्याने आणखी १५ ते १६ लाखांची मागणी केली. मुलगा अनोळखी देशात असल्याने, काकांनी त्याला १६ लाख रुपये पाठविले.तो रोज कुटुंबीयांच्या संपर्कात असे. दिवसभराच्या घडामोडी कुटुंबीयांसोबत शेअर करत असे. याच दरम्यान त्याने तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली नसल्याचे गेल्या वर्षी कुटुंबीयांना समजले. या प्रकारामुळे धक्का बसल्याने त्यांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा करत, त्याला मुंबईत येण्यास सांगितले.त्यानेही सप्टेंबरमध्ये मुंबईत येणार असल्याचे सांगितले. १६ आॅगस्टपासून त्याने कुटुंबीयांचे कॉल घेणे बंद केले. त्यानंतर, २ सप्टेंबरपासून तो नॉट रिचेबल झाला. त्यांनी दूतावासामार्फत चौकशी केली, तेव्हा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच तो पोलंडच्या विद्यापीठातून निघून गेल्याचे सांगितले. पोलंड प्रशासन, इंटरपोल, तसेच दूतावासाच्या मदतीने ते मुलाचा शोध घेत आहे. मुलाचा फोन कधी येईल, याकडे कुटुंबीयांचे लक्ष लागले आहेत.घरात खणाणणाºया प्रत्यके कॉलकडे त्यांचे लक्ष असते.तरुणीच्या मेलमुळे काळजीत भर..दोन आठवड्यांपूर्वी त्यांना श्रेया सिंग नावाच्या मुलीचा मेल आला. त्यात राकेशसोबत लग्न केले असून, मी सहा महिन्याची गरोदर असल्याचे सांगून दोघेही कॅनडामध्ये स्थायिक झाल्याचे सांगितले. राकेशची काळजी करू नका, असेही नमूद केले. मात्र, तपासात तो बनावट मेल असल्याचे समोर आले. त्यामुळे मुलाला कोणीतरी चुकीच्या दिशेने नेत असल्याची भीती त्याचे काका भीम चौहान यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
पोलंडला शिक्षणासाठी गेलेला एरॉनॉटीकल इंजिनीअर बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 3:18 AM