Join us

बाधित आणि पोलिसांत धक्काबुक्की

By admin | Published: December 28, 2016 4:09 AM

केडीएमसीच्या रस्तारूंदीकरण मोहीमेला बाधितांकडून होणारा विरोध मंगळवारी शिगेला पोहोचल्याचे चित्र पहावयास मिळाले. पश्चिमेकडील सूचकनाका येथील बाधित नागरिकांनी

कल्याण : केडीएमसीच्या रस्तारूंदीकरण मोहीमेला बाधितांकडून होणारा विरोध मंगळवारी शिगेला पोहोचल्याचे चित्र पहावयास मिळाले. पश्चिमेकडील सूचकनाका येथील बाधित नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी करत रूंदीकरणाच्या कारवाईला कडाडून विरोध केला असतानाही मंगळवारी पुन्हा कारवाईसाठी आलेल्या पथकाला स्थानिकांनी रस्ता रोको करून रोखले. यानंतर बाधितांनी महापालिकेच्या मुख्यालयावर धडक देत प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. यावेळी बाधित आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, या विरोधाला न जुमानता महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली.कल्याण-डोंबिवली महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईला सुरूवात केली असून रस्ता किती फुट रूंद केला जाणार याबाबत नागरीकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या बाधितांना प्रत्येक अधिकाऱ्याकडून वेगवेगळी उत्तरे दिली जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये संताप पसरला आहे. बाधितांचे पुनर्वसन कुठे केले जाणार आहे, याचीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्यामुळे कमालीचे गोंधळाचे व अस्वस्थतेचे वातावरण आहे. पालिका अधिकारी कारवाई करत निघून जातात त्यानंतर तयार होणारा मातीचा ढिगारा उचलण्याचे सौजन्य प्रशासनाकडून दाखवले जात नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान यापूर्वी कारवाई केलेल्या ठिकाणी मंगळवारी पुन्हा एकदा महापालिकेने कारवाई सुरू करताच संतापलेल्या बाधितांनी सूचक नाका येथे रस्ता रोको करत या कारवाईला विरोध केला. संतप्त झालेल्या शेकडो बाधितांनी थेट केडीएमसीच्या मुख्यालयावर धडक देत आयुक्तांनी भेट द्यावी व पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपली मागणी लावूनच धरली. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ हे आंदोलन सुरु होते. अखेर शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली असता बाधितांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आयुक्त ई रवींद्रन यांनी आश्वासन दिल्याची माहिती रिपाइं युवक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांनी दिली. (प्रतिनिधी)प्रचंड फौजफाटा तैनातकोपर येथील कारवाई दरम्यान बंदोबस्तासाठी १०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याचबरोबर महापालिकेचे २०० कर्मचारी, डोंबिवली विभागाचे विभागीय उपायुक्त सुरेश पवार, प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते, प्रभाकर पवार, प्रकाश ढोले, शांतीलाल राठोड, श्वेता शिंगासने, स्वाती गरूड, शरद पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उपअभियंता प्रशांत भुजबळ, नंदकुमार पाथरे, महेश गुप्ते आदींचा ताफा उपस्थित होता. डोंबिवलीत मोर्चा : डोंबिवलीतील ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील कोपर रोडवर सुकऱ्या शिवा म्हात्रे या रस्त्यावर रूंदीकरणासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. या कारवाईमुळे ४१ बांधकामे बाधित होणार होती. विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेविका शारदा पाटील यांचा देखील समावेश होता. जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने ती तोडण्यात आली. पुनर्वसन झालेच पाहिजे : स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केडीएमसीच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला. मात्र बाधितांचे पुनर्वसन झालेच पाहिजे, अशी मागणी केली. विकासासाठी रस्तारूंदीकरण होणे गरजेचे असले तरी विस्थापितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.