मुंबई: शेतकरी-आदिवासींच्या मुंबईत धडकलेल्या मोर्चाचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. मोर्चेकºयांच्या मागण्या रास्त असून त्या शासनाने तत्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. त्यावर, सरकार मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून कालबद्ध निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सभागृहाच्या अजेंड्यावर आज माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्याचा एकच विषय होता पण कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी मोर्चाकडे लक्ष वेधले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांनीही मोर्चेकºयांना तत्काळ न्याय देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की मोर्चेकºयांनी मांडलेल्या सर्व विषयांना आमचेही समर्थन आहे. मोर्चेकºयांशी नाशिकमध्येच चर्चा केली असती तर ते मुंबईत आले नसते, अशी टीका अजित पवार यांनी केली. त्यावर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चर्चेसाठी गेले होते पण मोर्चेकरी हे मोर्चा काढण्यावर ठाम होते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व्हीस रोडने येण्याची विनंती त्यांनी मान्य केली. आज विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून रात्रीच ते आझाद मैदानाकडे आले, अशी प्रशंसा मुख्यमंत्री आणि सर्वांनीच केली.>विधान परिषदेतही चर्चांविधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी किसान मोर्चाचा विषय उपस्थित केला. दोनशे किलोमीटर पायी प्रवास करत हजारो शेतकरी मुंबईत आले आहेत. मोर्चा पाहून कुठलेही शेतकरी मन हेलावून जाईल. अनवाणी, रक्तबंबाळ पायाने आलेल्या शेतकरी, आदिवासी शेतक-यांना सरकार आता फसवू शकणार नाही, असे ते म्हणाले.या अगोदरच शेतक-यांचे प्रश्न समजावून घेऊन, ते सोडवण्यासाठी शासनानें प्रयत्न केले असते तर आज या शेतक-यांना १८० किलोमीटर पायी चालत मुंबईत येण्याची वेळ आली नसती, असे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे , हेमंत टकले व जयवंत जाधव यांनी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेतकरी मोर्चाचे विधिमंडळात पडसाद, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 6:11 AM