मुंबई - आशिष शेलार कुणाच्या मतांनी आमदार झाले? हादेखील विचार करा. आमच्या जीवावर ते मांडीला मांडी लावून निवडून आले. वेळ बदलली म्हणून भाषा बदलण्याचं काम ते करतायेत. वरळीतील शपथपत्राची काळजी करू नका. वरळीतला शिवसैनिक, मतदार हा निष्ठेने आहे. फक्त पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र आम्ही दिलेत. अजून मतदारांपर्यंत पोहचलो नाही असा टोला शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांना लगावला.
सचिन अहिर म्हणाले की, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत ५० टक्के पदाधिकारी भाजपाचे करावेत. महापालिकेत स्वतंत्रपणे लढून वरळीत खातेही उघडता आलं नव्हतं. वरळीतच हंडी फोडायची असेल तर तुमचा मतदारसंघ बदली करा. वरळी मतदारसंघातून निवडून लढवा. वरळीकर जनता काय आहे ते दाखवून देतील असं आव्हान त्यांनी शेलारांना दिले.
तसेच हायकोर्टाच्या निर्देशामुळे आम्ही उत्सव काही काळ स्थगित केला. परंतु तो बंद केला नाही. शिवसेनेच्या वतीने त्याठिकाणी हंडी लावण्यात येते. जांबोरी मैदान सुशोभीकरणाचं काम आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्याठिकाणी मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे टाळलं पाहिजे. लोकांची नाराजी होते. मैदान खराब होते. मैदान वापरायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही मैदानात कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपाच्या छोट्या कार्यकर्त्याने ती परवानगी घेतली. वरळी नाक्यावर भाजपाची पारंपारिक हंडी लावण्याचं काम आमदार सुनील राणे करत होते. मग त्यांना हायजॅक करून जांबोरी मैदानावर हंडी लावलीय का? मग भाजपाच्या हंडीचं काय होणार? याची चिंता भाजपानं करावी असंही सचिन अहिर यांनी आशिष शेलारांना सुनावलं.
दरम्यान, महापालिकेत भाजपानं वरळीत खाते उघडून दाखवावं. वरळीचा मतदार शिवसेनेच्या पाठिशी खंबीर आहे. आम्ही हंडी फोडायला येतोय असं ट्विट करतात. वरळीत स्वागत आहे. कुणावर निर्बंध नाही. वरळीतील जनता एकसंघ आहे. पुढच्या काळात मतांच्या माध्यमातून वरळीतील जनता शिवसेनेसोबत असल्याचं दाखवून देईल असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार परतण्याची चिन्हेकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्वप्रकारे आमिष दाखवून तरी निष्ठेने आमदार आमच्यासोबत एकत्र राहिले. कोर्टाच्या निर्णयानंतर तिकडचे इकडे किती येतील. त्याची धाकधूक शिंदे गटात आहे. त्यामुळे आमदारांना रोखण्यासाठी केविळवाणी धडपड सुरू आहे असं सांगत सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.