Join us

स्वस्त घरांचा विकासकांना घोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 6:07 PM

किंमती कमी होण्याच्या चर्चेमुळे गृह खरेदी लांबणीवर पडण्याची भीती

मुंबई – कोरोना संकटामुळे घरांच्या किंमती २० टक्क्यांनी कमी होतील असे भाकीत एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी व्यक्त केल्यानंतर विकासक काहीसे अस्वस्थ झाले आहेत. या आशयाच्या विधानांमुळे घरांच्या किंमती जास्तीत जास्त कमी होण्याची प्रतिक्षा लोक करतील. त्यातून खरेदी विक्रीचे व्यवहार आणखी लांबणीवर पडतील आणि विपरीत परिणाम आम्हाला भोगावे लागतील अशी भीती नरेडकोच्या प्रतिनिधींनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंग पूरी यांच्याकडे शुक्रवारी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर कोसळलेल्या आर्थिक संकटाची धार कमी कराण्यासाठी घरांच्या किंमती कमी करा आणि पूर्ण झालेली घरे तातडीने विका असा सल्ला स्टेट बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला आहे. मात्र, बांधकाम व्यवसायात आता पूर्वीसारखा नफा राहिलेला नाही. त्यामुळे किंमती २० टक्क्यांनी कमी करणे केवळ अशक्य असल्याचे मत ओबेराँय गृपचे विकी ओबेराँय यांनी शुक्रवारी एका वेबिनामरमध्ये व्यक्त केले.  

किंमती कमी झाल्या तर गृह खरेदीत गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढेल असे मत दीपक पारेख यांनी मांडले होते. मात्र, किंमती कमी होण्याची आशा वाढली तर गृह खरेदी लांबणीवर पडेल असे विकासकांचे मत आहे. त्यामुळे जर किंमत कमी करायची असेल तर स्टॅम्प ड्यूटी पाच टक्क्यांवरून एक टक्का करा आणि काम सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील घरांवर आकारला जाणारा पाच टक्के जीएसटी रद्द करा अशी मागणी या वेळी करण्यात आली. परंतु, तो भार सरकार पेलण्यास तयार होईल का हा प्रश्न आहे. स्वस्त घरांच्या मुद्यांवरून विकासकांमध्ये तू तू मैं मैं सुरू असल्याचे अधोरेखीत होते.  

-----------------------------------

रेराची मुदत आणखी वाढणार

लाँकडाऊन जाहीर झाल्यानंतर महारेराने १५ मार्चनंतर पूर्ण होणा-या प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. परंतु, ही वाढ अपुरी असून किमान एक वर्षांची वाढ द्यावी अशी मागणी नरेडकोच्यावतीने करण्यात आली आहे. त्यावर विविध राज्यातील रेराचे अध्यक्ष आणि संबंधित विभागाच्या अधिका-यांशी चर्चा सुरू आहे. येत्या दोन आठवड्यात त्याबाबतचा निर्णय होईल असे संकेत केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी दिले आहेत.

टॅग्स :बांधकाम उद्योगकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस