मुंबई : मुंबईत घर घेणे आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे़ मात्र घराचा हा प्रश्न विकास नियोजन आराखड्यातून सोडविण्याचा निर्धार पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केला आहे़ त्यानुसार मुंबईतील तीन हजार हेक्टरवर ३२२ ते ६४५ चौ़ फुटांची घरे बांधण्यात येणार आहेत़ अशा १० लाख घरांचा दर बांधकामांच्या दरावर निश्चित होणार आहे़, तर म्हाडाप्रमाणे लॉटरी काढूनच पालिका या सदनिकांचे वितरण करणार आहे़शहराच्या विकास आराखड्यात येत्या काही वर्षांमध्ये मुंबईत १० लाख परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ यासाठी ना विकास क्षेत्रातील २ हजार १०० हेक्टर जमीन मोकळी करण्यात आली आहे़ या जमिनी खासगी मालकांच्या असल्याने त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत़ त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या किमती निश्चित करताना जमीन खरेदी केल्याचा खर्च आकारण्यात येणार नाही़ बांधकामावर आलेल्या खर्चाच्या आधारेच या सदनिकांची किंमत निश्चित करण्यात येणार आहे़ त्यानुसार ३२२ ते ६४५ चौफ़ुटांची घरे बांधण्यात येणार आहेत़ मात्र यामध्ये लहान घरांना प्राधान्य देण्यात येणार आहे़ म्हाडामार्फत घरांची लॉटरी काढण्यात येते़ तसेच या घरांचीही लॉटरी पालिका काढणार असून, यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले़ (प्रतिनिधी)