बनावट स्टॅम्प मारून निघाले अफगाणला!
By Admin | Published: June 27, 2017 02:20 AM2017-06-27T02:20:03+5:302017-06-27T02:20:03+5:30
खऱ्या पासपोर्टवर खोटा ‘अरायव्हल’ शिक्का मारून, परदेशात स्थायिक होण्यासाठी निघालेल्या अफगाणी नागरिकांना हा प्रकार चांगलाच महागात पडला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खऱ्या पासपोर्टवर खोटा ‘अरायव्हल’ शिक्का मारून, परदेशात स्थायिक होण्यासाठी निघालेल्या अफगाणी नागरिकांना हा प्रकार चांगलाच महागात पडला. परदेशात तर सोडाच, पण मायदेशी परतण्यासाठीदेखील त्यांना आता खटाटोप करावे लागणार आहेत. कारण या प्रकरणी रविवारी सहार पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांचे पासपोर्टदेखील हस्तगत करण्यात आले आहेत. या अटक नागरिकांमध्ये चौदा वर्षीय मुलासह दोन महिलांचा समावेश आहे.
झेमराई वाझमा अब्दुल कादीर (४२), अझिझी खातेमा इहसानुल्ला (२०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत, तसेच अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची झेमराई ही आई, तर अझीझी ही त्याची मावस बहीण आहे. हे सर्व अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील राहणारे आहेत. या सर्वांना लंडनला स्थायिक होण्यासाठी जायचे होते. मात्र, त्यांना व्हिसा मिळत नव्हता. तेव्हा अफगाणी पासपोर्ट एजंटने त्यांना बल्गेरियाचे दोन पासपोर्ट बनवून दिले. त्यांना पुढे युकेचा व्हिसा मिळेल, असेही सांगितले. त्यानुसार, हे तिघे दिल्लीला आले. मात्र, त्यांचे पासपोर्ट संशयास्पद वाटल्याने, दिल्ली इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेऊन, बल्गेरिया दूतावासाला पाठविले आणि त्या दोघांना बाहेर पाठविले. मात्र, झेमराईच्या अफगाणी पासपोर्टवर दिल्ली ‘अरायव्हल’चा स्टॅम्प होता. या दोघांकडे असलेल्या अफगाणी पासपोर्टवर ते स्टॅम्प नव्हते. त्यामुळे त्यांना मायदेशी जाणे शक्य नव्हते. ही बाब त्यांनी अफगाणी पासपोर्ट एजंटला सांगितली. त्याने ही बाब भारतातील त्याच्या ओळखीच्या एजंटला कळवली. त्याने पासपोर्टवर बोगस शिक्के मारून दिले होते.