अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद, लंडन - मुंबई विमानाने बदलला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:10 AM2021-08-17T04:10:52+5:302021-08-17T04:10:52+5:30

मुंबई : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर या देशाची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रचलनावर मोठा परिणाम ...

Afghanistan's airspace closed, London-Mumbai route changed | अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद, लंडन - मुंबई विमानाने बदलला मार्ग

अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद, लंडन - मुंबई विमानाने बदलला मार्ग

Next

मुंबई : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर या देशाची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रचलनावर मोठा परिणाम झाला असून, पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. त्यात लंडन - मुंबई विमानाचाही समावेश आहे.

तालिबान्यांनी काबूल विमानतळाजवळ हिंसाचार माजवल्यानंतर ब्रिटीश एअरवेजने खबरदारी घेत आपल्या वैमानिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची सूचना केली. त्यानुसार अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीतून धावणारी विमाने अन्यत्र वळविण्यात आली. त्यात लंडन - मुंबई बीएडब्लू १३९ या विमानाचाही समावेश आहे. १५ ऑगस्टला लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून निघालेले हे विमान पॅरिस, ग्रीस, कैरो, रियाध, युएईमार्गे मुंबईत पोहोचले. त्याला ११ तासांहून अधिक अवधी लागला.

त्याआधी १३ आणि १४ ऑगस्ट रोजी बीएडब्लू १३९ विमानाने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीवरून उड्डाण केले होते. १४ ऑगस्टला हीथ्रो विमानतळावरून नेदरलॅंड, जर्मनी, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया, जॉर्जिया, अझरबैझान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे मुंबई असा या विमानाचा प्रवास झाला होता. हे विमान ९ तास १० मिनिटांत गंतव्य स्थानावर पोहोचल्याची माहिती सुत्रांनी दिली.

यासंदर्भात मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता, सोमवारी मुंबईहून जाणाऱ्या एकाही विमानाला मार्ग बदलावा लागला नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे मुंबईहून परदेशात थेट सेवा देणाऱ्या विमानांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्याचा परिणाम मुंबई विमानतळाला जाणवला नसल्याची माहिती देण्यात आली.

असे असले तरी मुंबईहून अमेरिकेला जाणारी विमाने व्हाया दिल्ली उड्डाण करतात. त्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सॅनफ्रॅन्सिको आणि शिकागोला जाणाऱ्या विमानांचा यात समावेश असल्याची माहिती हवाई वाहतूक तज्ञांनी दिली.

सोबत दोन नकाशे जोडले आहेत.

१) लंडन-मुंबई विमानाचा मार्ग १५ ऑगस्ट

२) लंडन-मुंबई विमानाचा मार्ग १४ ऑगस्ट

Web Title: Afghanistan's airspace closed, London-Mumbai route changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.