मनीषा म्हात्रे
मुंबई : भटक्या श्वानांना जेवण देण्यावरून प्राणी प्रेमीना आजही विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातच, कांजूर पश्चिमेच्या रुणवाल फॉरेस्ट सोसायटीत एका श्वान प्रेमी दाम्पत्यावर जमावाने हल्ला चढविला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलयानंतर क्रॉस एफआयआर दाखल करण्यात आले. या घटनेने दाम्पत्याला घर खाली करण्यासाठी दबाव वाढला. दुसरीकडे, स्वतःच्या श्वानाला घेऊन जाण्याचीही भिती वाटत असल्याचे या हल्ल्यात जखमी झालेल्या दिया साहा सांगतात.
दिया साहा सांगतात, नोव्हेम्बर पासून रुणवाल फॉरेस्ट टॉवर्समध्ये ८ मध्ये भाडे तत्वावर राहण्यास आहोत. रुणवाल फॉरेस्टमध्ये आठ टॉवर्समध्ये अंदाजे साडे चार हजार रहिवासी आहेत. टॉवर्स सहाच्या मागे ते भटक्या श्वानांना रात्री साडे ९ ते दहाच्या सुमारास जेवण देतात. ९ ऑकटोबर रोजी श्वानांना जेवण देण्यासाठी आलो. तेव्हा ३० ते ४० जण हातात लाठी काठी घेऊन येताना दिसले. श्वानांना जेवण देण्यास सुरुवात करताच जमावाने चौकशी करत हल्ला चढवला. त्यानी घराकडे धाव घेताच जमावाने त्यांचा पाठलाग केला. पोलीस येईपर्यंत मारहाण सुरु होती. दिया यांच्या तक्रारीवरून जमवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे सोसायटीच्या सचिवाची पत्नी निनिशा देवपूरा यांच्या तक्रारीवरून दिया आणि तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीत दिया आणि तिच्या पतीने हल्ला केलयाचा आरोप केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही दहशत कायम
गुन्हा दाखल झाल्यानंतरही १० ते १५ जणांच्या जमावाकडून घर खाली करण्यासाठी दबाव वाढला आहे. ते आजही हातात लाठी काठी घेऊन फिरताना दिसतात. आम्हीही दुसरीकडे घर शोधत आहोत. मात्र, अशा मानसिकतेच्या लोकांमुळे कोणीही भटक्या प्राण्याच्या मदतीसाठी पुढे येणार नाही. हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. माझे स्वतःचे श्वान घेऊन जाण्याचीही भीती वाटत असल्याचे दिया सांगतात.
सोसायटीच्या आवारात श्वानांकडून हल्ला
सोसायटीकडून होत असलेल्या आरोपात श्वान चावण्याच्या घटना वाढत आहे. जवळपास शेकडो हल्ले झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्येष्ठ नागरिक श्वानांच्या भीतीने बाहेर पडत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.