Join us

तिथे जायला भीती वाटते... हॉस्पिटल परिसरातील असुरक्षित जागा शोधणार रेसिडेंट डॉक्टर

By संतोष आंधळे | Published: August 16, 2024 9:21 AM

मुंबईत जे.जे., केईएम, सायन, नायर आणि कूपर या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर कार्यरत आहेत.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोलकात्यातील निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) कामबंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टर हॉस्पिटल परिसरातील असुरक्षित जागा कोणत्या किंवा जिथे जायला भीती वाटते, अशा जागा शोधून त्यांची यादी हॉस्पिटलच्या प्रशासनाला देणार आहेत. त्या ठिकाणी प्रशासन पथदिवे आणि सीसीटीव्ही बसविण्याची व्यवस्था करणार आहे.

मुंबईत जे.जे., केईएम, सायन, नायर आणि कूपर या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या रुग्णालयांशी वैद्यकीय महाविद्यालयेही संलग्न आहेत. 

राज्यभरातून या ठिकाणी रुग्ण येत असतात. येथे अनेकदा डॉक्टरांवर रुग्णांचे नातेवाईक वा समाजकंटक यांच्याकडून हल्ले झाले आहेत. या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही विस्तीर्ण जागेत पसरलेल्या या रुग्णालयांमध्ये अशा काही जागा अजूनही आहेत, जिथे रात्री जाण्यास निवासी डॉक्टरांना भीती वाटते वा त्यांना असुरक्षित वाटते. अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांचाही उच्छाद आहे.

या रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. या महाविद्यालयातही अनेक वेळा डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून आणि  समाजकंटकाकडून हल्ले झाले आहेत. त्यामुळे असे हल्ले होऊ नयेत, या याकरिता रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही अशा काही जागा आहेत, त्या ठिकाणी निवासी डॉक्टरांना विशेष करून रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटते. काही ठिकणी पथदिवे नाहीत, त्यामुळे अंधारात कुत्रे भुंकणे याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. 

अनेकदा निवासी डॉक्टरांना उपचारासाठी परिसरातीलच इतर इमारतींमध्ये जाताना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून जावे लागते. या सर्व भीतीच्या जागा शोधून त्याची यादी आता प्रशासनाला सादर केली जाणार आहे. निवासी डॉक्टरांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

रुग्णालय परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट करण्यासाठी रुग्णालय स्तरावर प्रशासन समिती करणार आहे. त्या अगोदरच आम्ही १५-२६ असुरक्षित जागा शोधून त्या रुग्णालय प्रशासनाला कळविल्या आहेत. त्या पुढील कार्यवाही ते करतील. त्याशिवाय आणखी काही असुरक्षित जागा परिसरातील असतील, त्याची माहिती निवासी डॉक्टरांकडून घेण्यात येणार आहे, तसेच त्या समितीला ही माहिती देण्यात येईल.- डॉ.संपत सूर्यवंशी, अध्यक्ष, मार्ड, जे जे रुग्णालय.

आम्ही आमच्या सुरक्षारक्षकांसोबत बैठक घेऊन रुग्णालय परिसरातील कोणत्या जागा सुरक्षित आहे. त्याची माहिती घेऊन ती रुग्णालय प्रशासनाला देणार आहोत.- डॉ. अक्षय डोंगरदिवे, जनरल सेक्रेटरी, बीएमसी, मार्ड.

टॅग्स :डॉक्टर