Join us

धक्कादायक! आफताबच्या कुटुंबाचाही श्रद्धाच्या हत्येत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:46 PM

विकास वालेकरांचा आरोप, आफताबच्या वडिलांची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आफताब श्रद्धाचा छळ करत होता. तिला त्रास देत होता. मारहाण करत होता. हे त्याचा कुटुंबीयांना ठावूक होते. तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आम्हालाही अंधारात ठेवले. ते पाहता त्यांचाही या हत्येत सहभाग असल्याचा आरोप श्रद्धाचे वडील विकास वालेकर यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी आफताबचे वडील अमीन यांचीही चौकशी केली. आफताबने गुन्हा कबूल केला असला, तरी पोलिस अजूनही ठोस पुराव्यांच्या शोधात आहेत.श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी पोलिसांकडे तक्रार केली आणि आफताब तिला मारहाण करतो, गळा दाबून ठार मारण्याची धमकी देतो, असे म्हटले होते, तेव्हाच त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला विश्वासात घेऊन याबाबतची माहिती द्यायला हवी होती, असे विकास वालेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्यांनी तसे केले असते, तर श्रद्धाचा जीव वाचला असता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

एखादी किरकोळ घटना सांगावी, तसे आफताबने मला श्रद्धाच्या मृत्यूबद्दल सांगितले. ती जिवंत नाही, असे सांगून मी तिला मारून टाकल्याचे तो म्हणाला. त्यामुळे आम्हाला धक्का बसला. त्याला त्या घटनेचा काहीही पश्चात्ताप झाल्याचे दिसले नाही, असेही वालेकर यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, आफताबचे वडील अमीन पूनावाला याची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. त्यांना आफताबच्या वागणुकीबद्दल कल्पना होती का, तो श्रद्धाला मारायचा, सिगारेटचे चटके द्यायचा, ठार मारण्याची धमकी द्यायचा, त्याचे ड्रगचे व्यसन या सगळ्यांबद्दल पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्याचे सांगण्यात आले. 

आफताबने श्रद्धाचा खून केल्याचे त्यांना ठावूक होते का, या मारहाणीशी, छळाशी, तिच्या खुनाशी घरच्यांचा संबध होता का, याबाबतही पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते. मात्र आफताब आमच्यापासून वेगळा रहात होता. त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. तो आमच्या संपर्कात नव्हता. आम्हाला काही सांगत नव्हता, असे अमीन यांनी पोलिसांना सांगितल्याचा दावा पोलिसांतील सूत्रांनी केला. आफताबची अपुरी राहिलेली पॉलिग्राफ चाचणी शनिवारी करण्यात आली. नंतर काही तास त्याची नार्को अॅनालिसिस चाचणीही करण्यात आली. मात्र त्यात आफताबने नेमके काय सांगितले ते समजू शकलेले नाही. या चाचण्यांवेळी त्याचा वावर सहज होता. त्याच्यावर कशाचा ताण असल्याचे जाणवले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

 श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवलेले असतानाच आफताबने डेटींग ॲपचा वापर करून एका मैत्रिणीला घरी बोलावले होते. ती मनोविकारतज्ज्ञ असल्याचे पोलिसांनी शोधून काढले. तिलाही पोलिसांनी बोलते केले.  ती त्याच्या घरी नेमकी कशासाठी आली होती. त्याने तिच्याशी काही चर्चा केली का, याबाबतही पोलिसांनी तिची चौकशी केल्याचे समजते. 

फोनचा शोध सुरू श्रद्धाचा फोन भाईंदरच्या खाडीत फेकल्याचे आफताबने आधी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार खाडीत शोध घेण्यात आला. मात्र फोन सापडला नाही. त्यामुळे तो खोटे बोलत असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पुरावा म्हणून श्रद्धाच्या फोनचा शोध अजून सुरू आहे. आफताबकडून त्याबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत.

टॅग्स :श्रद्धा वालकरगुन्हेगारीपोलिस