Eknath Shinde: तब्बल 12 दिवसांनी बंडखोर आमदार मुंबईत, विमानतळावर भाजप नेत्यांनी केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:55 PM2022-07-02T21:55:25+5:302022-07-02T21:55:49+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत.
मुंबई - राज्यातील राजकीय भूकंपानंतर सत्तांतर झाल्याचं देशाने पाहिलं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, दोन दिवसांनी आणि महाराष्ट्र सोडल्यापासून तब्बल 12 दिवसांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईत पाऊल ठेवले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमवेत विमानात आणि बसमधून आल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते आमदार प्रसाद लाड हजर होते. यावेळी, लाड यांनी सर्व आमदारांचं स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व खात्यांच्या रितसर बैठका शिंदे आणि फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत. तर, दुसरीकडे आपल्यासोबत बंडखोरी केलेल्या 50 आमदारांचीही ते काळजी घेत आहेत. म्हणूनच, 50 आमदारांना मुंबईला आणण्यासाठी ते स्वत: गोव्याला गेले होते. एकनाथ शिंदेंचा आमदारांसमवेत बसमधील एक व्हिडिओ समोर आला होता. आता, ह्या सर्व आमदारांचे मुंबईत आगमन झाले असून ते ताज प्रेसिडेंट हॉटेलवर उतरले आहेत.
मुंबई विमानतळावर या आमदारांचे स्वागत करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड उपस्थित होते. लाड यांनी हातात हात देऊन आमदार गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांचे स्वागत केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तब्बल 12 दिवसांनी हे आमदार परराज्यातून मायभूमीत परतले आहेत. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर काही आमदार नॉट रिचेबल होते, तेव्हापासून हे आमदार गायब होण्याचं आणि सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरू होतं, त्या राजकीय नाट्याचा पडदा आता पडला आहे. सोमवारी विधिमंडळात बहुमत चाचणी होणार आहे. त्यासाठी, आमदारांना कडेकोट सुरक्षेत मुंबईत ठेवण्यात आले आहे.
मुंबई - शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे आमदार मुंबई त पोहचले, स्वागत करताना भाजपचे प्रसाद लाड pic.twitter.com/pLkGxNojSq
— Lokmat (@lokmat) July 2, 2022
दरम्यान, शिंदे गटाच्या आणि सहकारी पक्षाच्या आमदारांसोबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. यावेळी, मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, येथील हॉटेल परिसराला छावणीचं रुप प्राप्त झालं आहे.
गोव्यातूनच एकनाथ शिंदे आमदारांसोबत
गोव्यातील हॉटेलमधून गोवा विमानतळावर येण्यासाठी सर्व आमदारांना एक बस केली होती. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्याशेजारी भाजप नेते रविंद्र चव्हाण हेही होते. आपली सुरक्षा आणि मुख्यमंत्र्यांचा फौजफाटा सोडून एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसोबत बसमध्ये दिसून आले. तेथून ते विमानाने मुंबईला येणार आहेत. आज मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त उपस्थितीत या आमदारांसमवेत बैठक होणार आहे. त्यामुळे, मोठा फौजफाटा मुंबईत आला आहे.