मुंबई - ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे १३ वर्षांनी पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. नाटक, चित्रपट, मालिका या तीनही क्षेत्रांत यशस्वी कामगिरी करणाऱ्या सई यांचे 'इवलेसे रोप' हे नवीन नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. सई यांनी नुकतीच याची घोषणा केली आहे. सर्वप्रथम १९८५मध्ये मराठी रंगभूमीवर आलेले सई परांजपे यांचे 'सख्खे शेजारी' हे नाटक २०१० मध्ये २५ वर्षांनी पुन्हा नव्या संचात सादर झाले होते.
सुयोगने सादर केलेल्या या नाटकात अरूण जोगळेकर, सुहास जोशी, सतीश पुळेकर, मीना गोखले, मंगेश कुळकर्णी, अरूण होर्णेकर आदी कलावंत होते. त्यानंतर थेट १३ वर्षांनी 'इवलेसे रोप' हे सई यांचे नवे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. एक नवीन नाटक रंगभूमीवर आणणार असून, हे आपले शेवटचे नाटक असेल असे सई परांजपे यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी जाहिर केले होते. त्यानुसार नुकताच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'इवलेसे रोप' या आगामी नाटकाची अधिकृत घोषणा केली आहे.
या व्हिडिओत सई म्हणाल्या की, नाटक हे माझे अतिशय लाडके माध्यम आहे. दूरदर्शन आणि चित्रपटांमध्येही खूप रमले, खूप काम केले, पण नाटक हे माझे अतिशय जिवलग माध्यम आहे. 'इवलेसे रोप'ची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक हे माध्यम अगदी योग्य ठरेल असे वाटल्याने याचे लेखन केले. त्यानंतर आवश्यक वाटल्यास सिनेमा करता येईल असा विचार केला, पण हि सिनेमाची गोष्ट असल्याचे मला वाटत नाही. हे कथानक अतिशय व्यक्तीप्रधान आहे. त्यामुळे रंगभूमीची चौकट याला योग्य न्याय देऊ शकेल असे वाटल्याचेही त्या म्हणाल्या.
वयाच्या ८५ व्या वर्षी सई एक नवीन नाटक रंगभूमीवर आणत आहेत. नातं पिकलं की अधिक गोड होतं अशी टॅगलाईन असलेल्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या खुसखुशीत नाटकात मंगेश कदम आणि लीना भागवत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.