मुंबई : कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग आज अखेर (गुरुवार) तब्बल पंधरा वर्षांनी खुला झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला हे रेल्वे स्थानक दादरनंतर सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक असल्याने नव्याने खुला झालेला भुयारी मार्ग येथील गर्दीचे व्यवस्थापन करेल, असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे.महानगरपालिकेतर्फे कुर्ला रेल्वे स्थानक येथील पूर्व-पश्चिमेस जोडणाºया भुयारी मार्गाचे उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले की, मुंबईचा विकास साधण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच साथ लाभली आहे, मुंबईकरांनी ही साथ अशीच पुढे द्यावी.महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, कुर्ला रेल्वे स्थानक येथील पूर्व-पश्चिमेस जोडणाºया भुयारी मार्गाची मागणी बºयाच वर्षांपासून कुर्लावासीयांनी केली होती. याकरिता या भागाचे माजी खासदार व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी आपला निधी यासाठी उपलब्ध करून दिला. महापालिका व रेल्वे प्रशासन यांनी योग्य समन्वय साधल्यामुळे हा भुयारी मार्ग साकारला आहे. महापालिका विविध उपक्रम, प्रकल्प सातत्याने मोठ्या प्रमाणात साकारत आहे. मुंबईकरांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो आम्ही पूर्ण करून दाखवू.>गोरेगाव-मुलुंड लिंक रोडकरिता मंजुरीही प्राप्तमहापालिकेच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडकरिता मंजुरीही नुकतीच प्राप्त झाली असून, हा प्रकल्पही नागरिकांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.>...तर गर्दीचे व्यवस्थापन झाले असते : कुर्ला येथील भुयारी मार्ग पूर्वेकडून थेट पश्चिमेला जोडण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र पंधराएक वर्षांनी जेव्हा हा मार्ग पूर्ण होतो तेव्हा किमान त्याची जोडणी रेल्वे स्थानकांना असणे अपेक्षित होते. मात्र यात प्रशासन कमी पडले आहे. असे झाले असते तर गर्दीचे व्यवस्थापन झाले असते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
तब्बल पंधरा वर्षांनी भुयारी मार्ग झाला खुला, पूर्व आणि पश्चिम जोडणारा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:09 AM