१९ वर्षांनी आला अधिक श्रावण मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 10:00 AM2023-07-17T10:00:57+5:302023-07-17T10:01:54+5:30
अधिक श्रावणमासानंतर १७ ॲागस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत निज श्रावणमास येणार आहे
ठाणे : मंगळवार, १८ जुलैपासून १६ ॲागस्ट २०२३ पर्यंत अधिक श्रावणमास येणार आहे. १९ वर्षांपूर्वी श्रावण अधिकमास २००४ मध्ये होता. त्यानंतर २०४२ मध्ये पुन्हा श्रावण अधिकमास असेल, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. अधिक मासाला पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंड्या महिना असेही म्हणतात.
अधिक श्रावणमासानंतर १७ ॲागस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव-व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत, असेही त्यांनी सांगितले. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.
या वर्षीच १६ जुलै २०२३ रोजी उत्तररात्री ५ वाजून ६ मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करीत आहे. यानंतर १७ ॲागस्ट रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. या काळात दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी दोन नावे देण्यात आली आहेत. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिक महिना धरला जातो. १८ जुलै ते ६ ॲागस्ट २३ या काळात
सूर्याचा राशीबदल झालेला नाही. त्यामुळे श्रावण हा चांद्र महिना अधिकमास झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.