२० वर्षाने कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा; आरोपीला ठाण्यातून अटक, सांताक्रुझ पोलिसांची कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: June 3, 2023 07:34 PM2023-06-03T19:34:42+5:302023-06-03T19:35:00+5:30
कामानिमित्त मुंबईत आलेल्या दिल्लीतील कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा करण्यास २० वर्षाने सांताक्रुझ पोलिसांना यश आले आहे.
मुंबई: कामानिमित्त मुंबईत आलेल्या दिल्लीतील कपडे व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा करण्यास २० वर्षाने सांताक्रुझ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी ठाण्यातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २००३ मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल नेस्टच्या रूम नंबर १०८ मध्ये दोघे जण राहण्यास आले होते. ३ एप्रिलच्या सकाळी १० वाजता हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी मास्टर की ने दरवाजा उघडला. बेडवर दीपक ऊर्फ देवा मुन्नावर राठोड (२३) हे चादर ओढून रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तर साथीदार बेपत्ता होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. राठोड हा कपडे व्यावसायिक असून दिल्लीवरून मुंबईत आरोपी रुपेश राय सोबत आले होते.
रुपेश हा मूळचा बिहारचा रहिवासी असून हत्येनंतर तो पसार झाला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी पथक १२ वेळा त्याच्या गावी जावून आले होते. अखेर, आरोपी बाबत काहीही माहिती न मिळाल्याने, न्यायालयाचे परवानगीने तपास तात्पुरता बंद करण्यात आला होता.
असा आला जाळ्यात
पुढे, गुन्हयाचे अनुषंगाने सपोनि तुषार सांवत व गुन्हे प्रकटीकरण पथक हे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाहिजे आरोपीताचा शोध घेण्यासाठी पुन्हा बिहार येथील मुझ्झफरनगर येथे गेले होते. तेथील स्थानिक पोलीस ठाणे औराई, राज्य बिहार यांचे मदतीने आरोपीताचे नातेवाईकांच्या हालचालींवर निगराणी ठेवून केलेल्या तपासात आरोपी ठाण्यातील माजिवडा येथे एका मिठाई च्या दुकानात नाव बदलून काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सांताक्रुझ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली.
जेवताना वाद म्हणून थेट हत्या...
हॉटेल मध्ये जेवत असताना दोघांमध्ये वाद झाला. याच रागात, आरोपीने बटर नाईफच्या सहाय्याने राठोडची हत्या करत त्याच्याकडील सव्वा लाख रुपयांची रोकड घेवून पसार झाला होता. पोलीस अटक करतील या भीतीने तो स्वतची ओळख लपवून वेगवेगळया ठिकाणी राहत होता.