Join us

लालबागच्या राजाचं विसर्जन..! साश्रूनयनांनी भाविकांनी दिला बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 9:19 AM

लालबागच्या राजा गिरगाव चौपाटीवर पोहचल्यानंतर त्याठिकाणी कोळी बांधवांकडून विसर्जनासाठी बोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबई – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या....अशा जयघोषात गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे. मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागच्या राजाची मिरवणूक गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास मंडपातून निघाली होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला तेव्हा लाखोंच्या जनसमुदायाने हात उंचावून बाप्पाचं दर्शन घेतले. तर  सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी लालबागच्या राजाचे समुद्राच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.  

लालबागच्या राजा गिरगाव चौपाटीवर पोहचल्यानंतर त्याठिकाणी कोळी बांधवांकडून विसर्जनासाठी बोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. लालबागच्या राजासाठी खास तराफा तयार केला होता त्यावर मूर्ती ठेऊन निरोपाची आरती करण्यात आली. त्यानंतर याच तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेले. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची प्रचंड गर्दी लोटली होती. ज्या श्रद्धेने गेल्या १० दिवसांपासून बाप्पाची सेवा केली त्याच भावाने पुढल्या वर्षी बाप्पा लवकर या अशी भावनिक साद भक्तांकडून लालबागच्या राजाला घातली गेली.

अनंत चतुर्दशीला बहुतांश सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होते. यंदाही लालबागच्या राजाची मिरवणूक २३ तासांहून अधिक काळ चालली. कोळी समाजाकडून १९३४ मध्ये लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली होती.  लालबागच्या राजाचे यंदा ९० वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी दरवर्षी हजेरी लावत असतात. लालबागचा राजा मिरवणुकीसाठी ज्या ज्या मार्गाने पुढे गिरगाव चौपाटीवर पोहचत असतो तिथे प्रत्येक चौकात त्याचे हार घालून, पुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी लाडक्या बाप्पाच्या निरोपावेळी गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते.

गेल्या १० दिवसांपासून मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला होता. गिरगाव, जुहु, दादर यासारख्या चौपाटीवर अनेक मोठमोठ्या गणपतीचे विसर्जन केले जाते. चैतन्यपूर्ण वातावरणात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. लालबाग राजाच्या मिरवणुकीचा थाट वेगळाच असतो. लालबागच्या मार्केटमध्ये हा गणपती बाप्पा विराजमान असतो. मागील १० दिवस राजाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक रांगा लावतात. १५-१६ तास रांगेत उभे राहून गणेशभक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. ज्यावेळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघते तेव्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ भक्त मोठ्या संख्येने जमलेले असतात. फुलांच्या पुष्पवृष्टीत लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी लोकं आतुरलेले असतात.  

टॅग्स :गणेशोत्सवलालबागचा राजा