२४ तास उलटल्यानंतर कोविड बाधीत ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला मिळाला अखेर रुग्णालयात प्रवेश !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:20 PM2020-05-20T18:20:00+5:302020-05-20T18:21:48+5:30
कोविड रुग्णांची संख्या वाढत असतांना आता मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर बेड मिळत नाही,
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईत कोविड रुग्णाला पालिका व खाजगी रुग्णालयात कोणी बेड देत का अशी विनवणी सध्या अनेक कुटुंब करत आहेत. तर रोज कोविड रुग्णांची संख्या वाढत असतांना आता मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर बेड मिळत नाही. अँम्ब्युलन्स मिळत नाही सत्य परिस्थिती आहे.तर कोविड बाधीत जेष्ठ नागरिकांच्या हाल तर विचारूनच नका अशी काहीशी भयावह स्थिती आहे.
दादर पश्चिम राम मारुती रोड वर राहणाऱ्या व अंथरुणावर खिळलेल्या ८३ वर्षीय जेष्ठ नागरिकाला कोविड झाल्याचे परवा रात्री पालिकेच्या जी उत्तर वॉर्डला कळले.तर त्यांच्या कुटुंबियाना काल याबाबत पालिकेने माहिती दिली.पालिकेच्या रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने आपल्याला प्रवेश मिळू शकणार नाही,आपण खाजगी रुग्णालयात ऍडमिट करा असे त्यांच्या कुटुंबियाना सांगण्यात आले.काल दिवसभर या रुग्णांच्या कुटुंबियांनी मुंबईतील अनेक खाजगी हॉस्पिटल पालथी घातली,मात्र आमच्या कडे खाटाच उपलब्ध नाही असे त्यांना सांगण्यात आले.हॉस्पिटल मिळत नसल्याने सदर रुग्णांसह त्यांची पत्नी व मुलगा सोबत घरीच होते.
सदर बाब वॉच डॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांना समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना आज दुपारी ई मेलद्वारे निदर्शनास आणली.मग सूत्रे पटापट हलली.पालिका आयुक्तांनी १.१४ मिनिटांनी मेल वरून जी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर व आपत्कालीन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले अशी माहिती पिमेंटा यांनी दिली.
जी नॉर्थ वॉर्ड मधून आपल्या रुग्णाला पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल असे या कुटुंबाला फोनवरून सांगण्यात आले.दुपार पासून सदर कुटुंब अँम्ब्युलन्सची वाट बघत होते,मात्र अखेर आज दुपारी साडेचार वाजता या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी अँम्ब्युलन्स आली.आणि त्यांना मग पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घरून नेण्यात आले अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.