अखेर २५ वर्षांनी मराठी-उर्दू शब्दकोश तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:06 AM2018-02-23T03:06:50+5:302018-02-23T03:06:53+5:30
मराठी आणि उर्दू भाषा अधिकाधिक समृद्ध करणारा देशातील पहिलाच मराठी-उर्दू शब्दकोश लवकरच भेटीस येणार आहे.
स्नेहा मोरे
मुंबई : मराठी आणि उर्दू भाषा अधिकाधिक समृद्ध करणारा देशातील पहिलाच मराठी-उर्दू शब्दकोश लवकरच भेटीस येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने प्रकाशित होणाºया या कोशात जवळपास सात हजार शब्दांचा संग्रह आहे. येत्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनी (मंगळवारी) हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. थोर इतिहास संशोधक, हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सेनानी आणि भाष्यकार दिवंगत डॉ. देवीसिंग चौहान गुरुजी यांनी जवळपास ४० वर्षांपूर्वी १९७९मध्ये या शब्दकोशाचा संकल्प केला होता. या शब्दकोशामुळे मराठीसह उर्दू भाषेचा प्रचार, प्रसार होणार आहे.
देवीसिंग चौहान आणि डॉ. एहसानुल्ला कादरी या दोघांनी कोशाकरिता संपादनाचे काम केले आहे. या कोशात मराठी शब्दांचे अर्थ फारसी लिपीत आहेत. म्हणजेच मराठी-हिंदी-उर्दू-फारसी अशा पद्धतीने कोशात अर्थ दिला आहे. १९९३ साली हा शब्दकोश हस्तलिखित स्वरूपात तयार झाला होता.
मात्र हा शब्दकोश हस्तलिखित स्वरूपात असल्याने साहित्य संस्कृती मंडळाने तो परत केला. त्यामुळे दोन वर्षांनी १९९५मध्ये हा शब्दकोश टायपिंग स्वरूपात पाहिजे असल्याचे सांगत साहित्य संस्कृती मंडळाने परत केला.
डॉ. एहसानुल्ला कादरी यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, २००२ साली एका तज्ज्ञाने या कोशाच्या टायपिंगचे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा बीडच्या भाषा जाणकाराने अखेर हा शब्दकोश टायपिंग करून पूर्ण केला. मात्र तो शब्दकोश साहित्य संस्कृती मंडळात सादर केल्यानंतर राज्यभरातील शासकीय मुद्रणालयांत फारसी लिपी जाणकारांचा तुटवडा जाणवला. त्यामुळे प्रकाशनाच्या वाटेवर आलेले हे शब्दवैभव पुन्हा दुर्लक्षित राहिले. तसेच, हा शब्दकोश अनुदानाच्या पाठबळाशिवाय पूर्ण केल्याची माहितीही त्यांनी दिली. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड यांची निवड झाल्यानंतर त्यांनी या शब्दकोशासाठी अमूल्य मार्गदर्शन केल्याची माहिती डॉ. कादरी यांनी दिली. त्यांनी हा शब्दकोश स्कॅनिंग करून प्रकाशन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अखेरीस २५ वर्षांच्या विलंबानंतर हा शब्दकोश मराठी-उर्दूू अभ्यासक, विद्यार्थी आणि साहित्यरसिकांच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी सांगितले.
देवाणघेवाण होईल
उर्दूला मुसलमानांची भाषा मानणाºयांनी हेही जाणून घ्यावे की उर्दू कविता समृद्ध करणाºयांमध्ये या हिंदुस्तानी कवींचे योगदान खूप मोठे आहे. जगन्नाथ आजमद, अर्श, मल्सियानी, पं. बृजनारायण चकबस्त लखनवी, उर्दूला पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारे फिराक गोरखपुरी यांचे नाव रघुपती सहाय होते हे अनेकांना माहीत नसेल.
नरेशकुमार शाद यांना तर कतआ या प्रकारात कमाल उंची गाठणारा कवी म्हणून समग्र उर्दूजगताने गौरविले आहे. त्यामुळे उर्दू भाषा ही केवळ ठरावीक वर्ग, समाज, समुदायाची मक्तेदारी नाही. ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि समृद्ध व्हावी यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. यामुळे मराठी उर्दू भाषेची देवाणघेवाण होण्यास मदत होईल.
च्हा शब्दकोश अनुदानाच्या पाठबळाशिवाय पूर्ण केल्याची माहिती डॉ. एहसानुल्ला कादरी यांनी दिली.