Join us

...अन् २५ वर्षांनंतर 'त्या' आत्मनिर्भर होऊन चालू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 2:39 PM

विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रिया उत्तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे आता ही महिला पुन्हा चालू शकतेय.

मुंबईत राहणाऱ्या ५७ वर्षीय एक महिला तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर कोणाचाही आधार न घेता चालू शकतायत. आतापर्यंत त्यांच्याव साधारणतः १२ विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण योग्य तो फायदा होऊ शकलेला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षं ही महिला घरी अंथरूणाला खिळून होती. परंतु आता मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात या महिलेवर (Constrained Revision Total Hip Replacement) ‘कान्स्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रिया उत्तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे आता ही महिला पुन्हा चालू शकतेय.वयाच्या ३०व्या वर्षी म्हणजेच १९९५मध्ये त्यांच्या डाव्या खोब्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. १९९६मध्येही शस्त्रक्रिया करून इम्पॉंट बसवण्यात आले होते. २००५मध्येही शस्त्रक्रिया झाली. लिंडा कोटक असं या महिलेचे नाव आहे. या महिलेला हिपच्या एव्हस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन)ची लक्षणे होती. कोटक यांना कोणाच्याही आधाराविना चालता येत नव्हते. चालताना त्यांना काठी किंवा वॉकरचा आधार घ्यावा लागत होता. याशिवाय घरी वावरताना त्या सरकत जात होत्या. यामुळे त्यांच्या उजव्या घोट्याला फ्रॅक्चर आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. चालता येत नसल्याने त्यांच्या मणका आणि गुडघ्यावरही खूप ताण आला होता. यासाठीही त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याशिवाय २०१९मध्ये कोटक यांच्यावर स्पाईन सर्जरीसुद्धा करण्यात आली. २०१२मध्ये दोन्ही गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.फेब्रुवारी २०२०मध्ये या महिलेला सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी त्यांना पाच वेळा स्थानिक रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांना मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयातील कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंन रिप्लेसमेंट तज्ज्ञ अँण्ड स्पाइन सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांच्याकडे उपचार सुरू झाले. यावेळी डॉक्टरांनी कान्स्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप रिप्लेसमेंट (टीएचआर) हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांची परवानगी घेऊन १६ जून रोजी या महिलेवर हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे ही महिला पुन्हा चालू-फिरू शकतेय. याशिवाय पूर्वीसारखे आनंदी आयुष्य जगू शकतेय.याबाबत माहिती देताना मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉईंन रिप्लेसमेंट तज्ज्ञ अँण्ड स्पाइन सर्जन डॉ. गिरीश भालेराव म्हणाले की, "कांस्ट्रेन्ड रिवाइज टोटल हिप प्रत्यारोपण ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या महिलेला अनेक वर्षांपासूनच दुखणं होतं. अनेक शस्त्रक्रिया झाल्या पण काही फरक पडला नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं आमच्यासाठी एक आव्हान होतं. हे आव्हान आम्ही स्विकारून शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना अनेक अडचणी आल्या. अस्थिर हिपवर शस्त्रक्रिया करणे हे खूप दुर्मिळ आहे. परंतु, धीराने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. साधारणतः पाच दिवस अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. परिणामी, आता ही महिला पुन्हा चालू-फिरू शकतेय." रूग्ण लिंडा कोटक म्हणाली की, "१२ शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा माझ्या पायावर उभी राहू शकेल अशी मला आशा नव्हती. पण वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी आज पुन्हा चालू लागले आहे. आता मी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची कामे करू शकते, याचा मला आनंद आहे.."