Join us

अखेर ७० वर्षांनी आली मुंबईतल्या 'या' पाड्यावर वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 2:08 AM

गोराईतील झामजड पाड्यावर ७० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरू झाला आहे. अदानी या वीज कंपनीने झामजड पाड्यात वायर टाकण्याचे काम सुरू केले होते

मुंबई : गोराईतील झामजड पाड्यावर ७० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरू झाला आहे. अदानी या वीज कंपनीने झामजड पाड्यात वायर टाकण्याचे काम सुरू केले होते. ते या आठवड्यात पूर्ण झाले असून, आता हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे. कित्येक वर्षांपासून आपल्याकडेही वीज येईल, या प्रतीक्षेत गोराई येथील या पाड्यातील नागरिक होते. येथील कुटुंबांना लवकरात लवकर वीजसेवेचा आनंद घेता येईल, याची खातरजमा कंपनीच्या टीमने स्थानिकांच्या मदतीने केली. ३ मे रोजी पहिल्यांदा येथे विजेचा दिवा सुरू झाला, तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येत आनंद साजरा केला. येथे वायर टाकण्याचे काम सुरू झाल्यापासून आपली घरेही प्रकाशात उजळून निघण्याची प्रतीक्षा करणारी लहान मुलेही आनंदी होती. 

अदानीकडून सांगण्यात आले की, आम्ही गोराईतील झामजड पाडा येथील विजेचे काम पूर्ण केले आहे. गावातील कुटुंबांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही हे काम पूर्ण करू शकलो. आपली घरे प्रकाशाने उजळलेली पाहताना, या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आलेली झळाळीपाहणे हा अत्यंत समाधानकारक अनुभव होता. दरम्यान, शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर छोट्या डोंगरावर असलेला झामजड पाडा आता येथे वीज दाखल झाल्याने, शहराच्या अधिक जवळ आला आहे.

टॅग्स :वीजमुंबई