९ वर्षांनंतर अखेर ‘तो’ कुटुंबीयाना भेटला!
By Admin | Published: February 2, 2017 03:29 AM2017-02-02T03:29:56+5:302017-02-02T03:29:56+5:30
३५ वर्षीय प्रकाश अहुजा या नावाने २००९ साली एका व्यक्तीला शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात दाखल केले. प्रकाशला क्षयरोग नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मात्र, त्याचे मानसिक
- स्नेहा मोरे, मुंबई
३५ वर्षीय प्रकाश अहुजा या नावाने २००९ साली एका व्यक्तीला शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात दाखल केले. प्रकाशला क्षयरोग नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मात्र, त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे त्याला रुग्णालयातील १७ क्रमांकाच्या वॉर्डमध्येच ठेवण्यात आले. त्यानंतर, तब्बल आठ वर्षांनंतर प्रकाशमध्ये दिसून आलेल्या सकारात्मक बदलानंतर, अखेर त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. रुग्णालयातील परिचारिका मीना कमाणे यांच्या अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यानंतर, नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रकाशची त्याच्या कुटुंबीयांशी भेट झाली.
शिवडी क्षयरोग रुग्णालयात १७ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये दाखल असणारा प्रकाश कायम शून्यात पाहत राहायचा, तसेच प्रकाश दिवसभरात केवळ नैसर्गिक विधींसाठी बेडवरून उठायचा. त्या वेळी चालताना समोर एखादी व्यक्ती आल्यास, त्या व्यक्तीस धक्का देऊन तो पुढे निघून जात असे. मात्र, कालानंतराने पुनर्विकासाच्या कारणास्तव १७ क्रमांकाच्या वॉर्डमधील रुग्णांना चौथ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आल्याची माहिती परिचारिका मीना कमाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानंतर, प्रकाशचे मानसिक संतुलन सुधारण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू करण्यात आले.
औषधोपचार आणि समुपदेशनानंतर प्रकाश एक-एक शब्द बोलू लागल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले. त्यानंतर, हळूहळू बेडवरून उठताना व्यक्तीसमोर आल्यास धक्का न देता, तो थांबत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा छोट्या-छोट्या बदलानंतर २०१६ साली आॅक्टोबर महिन्यात प्रकाशने संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्याच्याशी बोलून प्रकाशच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रक्रियेत पती संजय कमाणे यांची आणि त्यांच्या मित्रपरिवाराची मदत घेतल्याचे मीना यांनी सांगितले.
प्रकाशशी संवाद साधल्यावर, त्याचे खरे नाव ‘प्रकाश गोलाणी’ असून, तो बुलढाणा येथील चिखली गावचा असल्याचे समजले. त्यानंतर, पती संजय यांनी त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचून प्रकाशविषयी माहिती दिली. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी प्रकाशचा मृत्यू झाला, असे वाटल्याने तो जिवंत आहे, यावर विश्वास ठेवणे शक्य झाले नाही. त्यामुळे मग स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांना हे पटवून द्यावे लागल्याची माहिती मीना यांनी दिली. कायदेशीर प्रक्रियेनंतर ओळखपत्र आणि संबंधित माहितीची पडताळणी झाल्यावर, अखेर ५ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशची कुटुंबीयांशी भेट झाली. त्याप्रसंगी, प्रकाश आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये विलक्षण आनंदाचे वातावरण दिसल्याची भावना मीना यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. अखेर ७ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे मीना यांनी सांगितले.
- प्रकाश कायम शून्यात पाहत राहायचा, तसेच प्रकाश दिवसभरात केवळ नैसर्गिक विधींसाठी बेडवरून उठायचा. त्या वेळी चालताना समोर एखादी व्यक्ती आल्यास, त्या व्यक्तीस धक्का देऊन तो पुढे निघून जात असे. मात्र, कालानंतराने पुनर्विकासाच्या कारणास्तव १७ क्रमांकाच्या वॉर्डमधील रुग्णांना चौथ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आल्याची माहिती परिचारिका मीना कमाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानंतर, प्रकाशचे मानसिक संतुलन सुधारण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू करण्यात आले.