मुंबई : शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला होता. गेल्या चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी झडती सुरू होती. चार दिवसापासून सुरू असलेली ही झडती अखेर संपली. तब्बल ७२ तासानंतर आयकर विभागाचे अधिकारी सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परतले.
दरम्यान, या चार दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांच्या हाती नेमकं काय लागले ते अद्याप गुलदस्त्यात आहे. या छापेमारीच्या या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसंचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले होते. शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही १८ ऑगस्ट २०२१ रोजी आयकर विभाग आणि ईडी (ED) कडे तक्रार दाखल केली होती, असे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानुसारच कारवाई झाली का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर सलग चौथ्या दिवशीही आयकर अधिकाऱ्यांचा मुक्काम तिथेच होता. मात्र सकाळी इन्कम टॅक्सची सर्व टीम चौकशी करून परतली आहे. मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगावातील घरी ही कारवाई सुरू होती. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकला. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवरही आयकर खात्यानं छापा टाकून कारवाई केली. त्यामुळे या संपूर्ण चौकशीत इन्कम टॅक्स विभागाच्या हाती काय लागलं आहे हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.