मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून नोंदविण्यात आलेले ढगाळ हवामान विरल्यानंतर बुधवारी येथील कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, पारा वाढल्याने मुंबई पुन्हा एकदा घामाघूम झाली आहे.होळीदरम्यान मुंबईचे कमाल तापमान ३९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले होते. कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची वाढ झाली होती. ढगाळ हवामानामुळे तापमान खाली घसरले आणि पारा ३१ वर आला. मात्र, आता पुन्हा मुंबईकरांना अस्वस्थ करणाऱ्या पाऱ्याने उसळी घेतली आहे.२४ मार्च रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. २५ आणि २६ मार्च रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.
पाऱ्याची उसळी; मुंबईचं तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 8:47 AM