मुंबई - नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४ पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते.यंदा मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने आणि कोविड नंतर दोन वर्षांनी निघणारी काल सायंकाळी ६.३० येथील आझाद नगर २ येथील अंधेरी राज्याच्या मंडपातून हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात,वाजत-गाजत मिरवणूक निघाली.आज दुपारी एकच्या सुमारास साडेसतरा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले.
काल सायंकाळी ६.३० वाजता आरती झाल्यावर सजवलेल्या ट्रकवर आझाद नगर २ येथून अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर आझाद नगर, अंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोडवरून राजकूमार,अपनाबाजार,चार बंगला,पिकनिक कॉटेज,मछलीमार,गंगाभवन मार्गे आज सकाळी ११.३०च्या सुमारास वेसावे समुद्रकिनारी पोहचली.
ठिकठिकाणी गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे स्वागत केले.तर विविध ठिकाणी अंधेरीकरांनी अंधेरीच्या राजावर पुष्पवृष्टी केली.तर अनेक गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर आपला अंगारकी संकष्टीचा उपवास सोडला. येथील माजी नगरसेवक दिवंगत मोतीराम भावे यांच्या कुटुंबांनी अंधेरीच्या राजाची पूजा केल्यावर आज दुपारी १ च्या सुमारास ढोल,ताशा,बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आताशबाजीत साडेसतरा तासांच्या मिरवणुकी नंतर अंधेरीच्या राजाचे विसर्जन झाले. यावेळी समुद्रकिनारी वेसावकरांनी व गणेश भक्तांनी येथे मोठी गर्दी केली होती.
आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदशक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी लोकमतला दिली. वेसावे गावातील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे खास बोटीतून विसर्जन करून अंधेरीच्या राजाला निरोप दिला अशी माहिती फणसे यांनी दिली.
दरवर्षी संकष्टीला होते विसर्जन
सन १९७३ साली आझाद नगर मध्ये राहात असलेले आणि गोल्डन टोबॅको, एक्सल,टाटा स्टील आणि अन्य कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचे कारखाने बंद पडले होते.आमचे कारखाने परत लवकर सुरू होवू दे,आम्ही अंधेरीच्या राजाचे संकष्टीला विसर्जन करू असा नवस त्यांनी अंधेरीच्या राजाला केला होता.आणि बंद असलेले सदर कारखाने व कामगारांची रोजीरोटी परत सुरू झाली.त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते.जोपर्यंत अंधेरीच्या राजाचे विसर्जन होत नाही,तोपर्यंत अंधेरीचा गणेशोत्सव संपत नाही अशी अंधेरीकरांची दृढ श्रद्धा आहे अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस व सचिव विजय सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पहाटे अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.यावेळी समितीचे सचिव विजय सावंत व उपाध्यक्ष अशोक राणे यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री व विभागप्रमुख अँड.अनिल परब,खासदार गजानन कीर्तिकर,शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमदार अमित साटम, आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्यासह इतर सर्वपक्षीय राजकीय नेते व अनेक सेलिब्रेटिंनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.तर गेल्या १४ दिवसात लाखो गणेश भक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले. समितीचे जनसंपर्क अधिकारी उदय सालीयन यांनी ही माहिती दिली.