- संदीप शिंदेमुंबई : वडाळा ते कासारवडवली या मार्गावरील मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या मोगरपाडा येथील कारशेडचे काम तातडीने सुरू झाले नाही, तर आक्टोबर, २०२२ पर्यंत या मार्गावरील मेट्रो सुरू करणे शक्य होणार नाही अशी निर्वाणीची भूमिका एमएमआरडीएने घेतली आहे. त्यानंतर, कारशेडची जागा संपादित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात सरकारी यंत्रणांना यश आले, तरी पुढील टप्प्यावर पर्यावरणप्रेमी या कारशेडच्या विरोधात शड्डू ठोकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आरे पाठोपाठ ठाणे मेट्रोच्या कारशेडचा मुद्दाही सरकारी यंत्रणांसाठी तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४) आणि कासारवडवली ते गायमुख (४ अ) या मार्गिकांसाठी मोगरपाडा येथे ४२ एकर जागेवर कारशेड प्रस्तावित आहे. या मेट्रोसाठी भूसंपादन करण्याचे प्रयत्न मे, २०१४ पासून सुरू आहे. सुरुवातीला ओवळा येथे प्रस्तावित कारशेडला विरोध केल्यानंतर, मोगरपाड्याचा पर्याय स्वीकारण्यात आला. मात्र, ही जागा देण्यास स्थानिकांचा टोकाचा विरोध आहे. त्यामुळे कारशेडसाठी आवश्यक असलेली मोजणीही हे शेतकरी करू देत नाहीत.
गेल्या आठवड्यात मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या एका बैठकीत आयुक्त आर. ए. राजीव यांनी या कारशेडचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक असून, जागा संपादित होत नसल्याने कामाच्या निविदा प्रसिद्ध करणे शक्य होत नसल्याची बाब त्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणली होती. त्यानंतर, शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक बोलावण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.
शेतकºयांची आक्रमक भूमिकाया ठिकाणी सरकारी मालकीची सुमारे २०० एकर जागा आहे. त्यापैकी ७८ हेक्टर जागा स्थानिक भूमिपुत्रांना करण्यासाठी दिली होती. त्याचे पोटहिस्से झालेले नाहीत. शेतकºयांनी जागेची मोजणी करून दिली, तर नक्की कोणत्या ठिकाणची ४२ एकर जागा कारशेडसाठी आवश्यक आहे, ते स्पष्ट होणार आहे. त्या शेतकºयांना नजीकची पर्यायी जागा देण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची तयारी आहे. त्याशिवाय एमएमआरडीएही मोबदला देण्यास तयार आहे. मात्र, शेतकरी मोजणीच करू देत नसल्याने मोठी कोंडी झाली. येत्या आठवड्यात शेतकरी, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ही कोंडी फोडली जाईल, अशी माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली. येत्या गुरुवारी बोलावलेली ही बैठक काही कारणास्तव रद्द झाली आहे.पर्यावरणवाद्यांचा वेट अँड वॉचशेतकºयांच्या विरोधामुळे जर कारशेड रद्द झाले, तर आम्हाला पर्यावरणाच्या रक्षणसाठी लढा उभारण्याची गरज पडणार नाही. मात्र, शेतकºयांनी जागा देण्यास तयारी दर्शविली आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचा ºहास करून कारशेड उभारले जाणार असेल, तर त्याला आमचा विरोध असेल, असे पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी सांगितले. या मार्गिकेबाबतची अस्पष्टता, त्यात होणारी झाडांची कत्तल आणि आवश्यक परवानग्यांना दिलेली बगल या मुद्द्यांवरील आमच्या याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. वेळ आल्यास मोगरपाडा कारशेडच्या विरोधातही याचिका दाखल करू, तसेच आरेच्या धर्तीवर रस्त्यावरील आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.