Join us

‘अब तक ६५’ नंतर, आता आर्थिक गुन्हे शाखेतील १३ जणांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 2:03 AM

Police : पोलीस अधिकाऱ्यांच्या या घाऊक बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली होती.

मुंबई : गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी केलेल्या बदल्यांनंतर आता आर्थिक गुन्हे शाखेत ५ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असलेल्या १३ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सोमवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. गुन्हे शाखेत ८ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत पोलीस उपनिरीक्षकांसह अंमलदार तसेच ५ वर्षे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. त्यानुसार गेल्या महिन्यात गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोबतच स्थानिक पोलीस ठाण्यातील २१ अधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या या घाऊक बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली होती.गुन्हे शाखेपाठोपाठ आता आर्थिक गुन्हे शाखेत ५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या १३ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. यात आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख, विनोद भालेराव यांची विशेष शाखा १ येथे तर जितेंद्र मिसाळ आणि कुंडलिक गाढवे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, बळीराम धस यांची वाहतूक विभागात तर किरण जाधव यांची दक्षिण नियंत्रण कक्ष सायबर विभागात बदली करण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर गायकवाड (वाहतूक), विक्रांत शिरसाठ (एमएचबी कॉलनी), संदीप बडगुजर (वडाळा टी. टी.), दीपक कदम (मानखुर्द), प्रवीण फणसे (भांडुप), महेश तांबे (पंतनगर) आणि धनंजय देवडीकर (शिवाजीनगर) यांची विविध पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत सुमारे १०० अधिकारी तसेच सव्वादोनशे अंमलदार कार्यरत आहेत.

टॅग्स :पोलिसबदली