Join us  

Rutuja Latke: राजीनाम्याचे पत्र स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटकेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 11:23 AM

Andheri East Assembly By Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने राजीनामा स्वीकारल्याचं पत्र ऋतुजा लटके यांना दिलं. हे पत्र स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला आहे.

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढत सक्त आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने अखेर आज ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला. तसेच राजीनामा स्वीकारल्याचं पत्र ऋतुजा लटके यांना दिलं. हे पत्र स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटके यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला आहे.

याबाबत ऋतुजा लटके म्हणाल्या की, आज सकाळी माझा राजीनामा स्वीकारून तसं पत्र पालिकाअधिकाऱ्यांनी मला दिलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. यासाठी मला संघर्ष करावा लागला. मात्र संघर्ष करण्याची माझी इच्छा नव्हती आणि एवढ्याशा गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पालिकेमध्ये मी लिपिक पदावर आहे आणि लिपिकाच्या राजीनाम्याकरिता एवढ्या पालिका आयुक्तांकडे गोष्टी न्याव्या लागतात, याचं मला आश्चर्य वाटतं, असा टोला ऋतुजा लटके यांनी लगावला.

मला राजीनाम्याचं पत्र मिळालं आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी अंधेरीला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले तसेच मुरजी पटेल यांच्या उमेदवारीबाबत त्या म्हणाल्या की, इथे लोकशाही आहे आणि प्रत्येकजण आपला अर्ज भरू शकतो. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवारही अर्ज भरतील.

यावेळी मशाल ह्या चिन्हाबाबत ऋतुजा लटके म्हणाल्या की, मशाल हे चिन्ह आमच्यासाठी नवे नाही आहे. १९८५ मध्ये छगन भुजबळ हे मशाल ह्या चिन्हावर लढले होते आणि निवडून आले होते. त्यामुळे मशाल हे आमच्यासाठी लकी आहे. माझे पती अंधेरी मतदारसंघात परिचित होते. रमेश लटके हे कोण हे सांगण्याची गरज नव्हती. मात्र माझा चेहरा नवा आहे. त्यामुळे मला मतदारसंघात फिरावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.     

टॅग्स :शिवसेनाअंधेरी पूर्वभाजपाएकनाथ शिंदे