काल अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदाच्या पक्षप्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी अभिनेता गोविंदा याने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अभिनेता गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली. 'गोविंदा यांचे चित्रपट आता चालत नाहीत. त्यांचा शेवटचा चित्रपट आपटल्यानंतर त्यांना काहीतरी हवं होतं. तसेच शिंदे गटाने एखादा चालणारा तरी नट घ्यायला हवा होता', अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती, या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
सीएम एकनाथ शिंदे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, “गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला कलाकार आहे.” शिंदेंचं वक्तव्य ऐकून सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले, कोणीही कलाकारांचा अपमान करू नये. कारण माणसाचे दिवस कधी फिरतात हे कोणालाही माहिती पडत नाही. एका कलाकाराचा अपमान म्हणजेच संपूर्ण चित्रपटसृष्टीचा अपमान. कलाकारांविरोधात बोलणाऱ्यांना भोगावं लागू शकतं. यावरुन आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानच शिवाजी आढळराव पाटील यांना टोला लगावला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन सीएम शिदेंना विनंती केली आहे. कोल्हेंनी ट्विटमध्ये म्हटले की, धन्यवाद @mieknathshinde साहेब !आपल्या भावना अतिशय स्तुत्य आहेत. कलाकार हा आपल्या कलेने समाजाला प्रबोधन करणारा, समाजाला आरसा दाखवणारा "माणूस" असतो. परंतू आमच्या भागातील पूर्वी आपल्याच पक्षात असलेले व सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत "नट" म्हणून हिणवतात. माझ्या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत शिवशंभू विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. केवळ आकस म्हणून मला "नट" म्हणून हिनवणे योग्य नाही हे कृपया आपण आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावे !",अशी विनंती करत शिवाजी आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांनी टोला लगावला आहे.