मुंबई : सफाईकाम करताना अपघाती मृत्यू पावलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईतील सर्व कंत्राटी सफाई कामगार व कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले होते. आंदोलनाची दखल घेत पालिकेने मृत कामगाराच्या कुटुंबाला नियमाप्रमाणे नुकसानभरपाई आणि वारसाला नोकरी देण्याचे मान्य केल्याचा दावा आंदोलनकर्त्या कचरा वाहतूक श्रमिक संघाने केला आहे. परिणामी, मागण्या मान्य झाल्याने बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेत असल्याची माहिती संघटनेने ‘लोकमत’ला दिली आहे. याआधी गुरुवारी सकाळी कांदिवली येथे हजेरी चौकीवर हजेरी लावून कामावर आलेल्या चिन्नप्पन हरिजन या कामगाराला सफाईकाम करीत असताना वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत्यूच्या २४ तासांनंतरही पालिकेतर्फे कोणत्याही अधिकाऱ्याने त्याच्या कुटुंबाची साधी विचारपूस केली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी पालिकेविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. मुंबई मनपात कंत्राटी पद्धतीने काम करणारे ४ हजार ५०० सफाई कर्मचारी आणि कचरा वाहतूक कामगार या कामबंद आंदोलनात सामील झाले होते.मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने सांगितले. पालिकेने अपघाती मृत्यू पावलेल्या कामगाराला तत्काळ नुकसानभरपाई घोषित करावी आणि त्याच्या वारसाला नोकरीत सामावून घेण्याची कामगारांची मागणी होती. सायंकाळी उशिरा पालिका अधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेत असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. (प्रतिनिधी)आश्वासनानंतर आंदोलन मागे : नुकसानभरपाई आणि वारसाला नोकरी मागत सर्वच कंत्राटी सफाई कामगार आणि वाहतूक कामगारांनी बेमुदत कामबंदची हाक दिली होती. मात्र सफाई कामगारांच्या शिष्टमंडळासोबत उशिरा झालेल्या चर्चेनंतर पालिकेने मृत कामगाराच्या कुटुंबाला नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संघटनेने केला; शिवाय एका वारसाला त्या ठिकाणी नोकरी देण्याचेही कबूल केल्याचे संघटनेने सांगितले.
आंदोलनानंतर पालिकेला जाग
By admin | Published: January 03, 2015 2:06 AM